कल्याण मधील पत्रीपुला जवळील हनुमान नगर कुष्ठ रुग्ण वसाहतीत ४० वर्ष कुष्ठ रुग्णांच्या विकासासाठी कार्य करणारे डोंबिवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त सैनिक गजानन माने यांना केंद्र शासनाचा पद्मश्री हा सन्मान जाहीर झाला आहे.
हेही वाचा- ठाणे : इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू
गजानन माने ६० वर्षापूर्वी डोंबिवलीत राहण्यास आले. लष्करातील सैनिकाची नोकरी पूर्ण करुन ते डोेंबिवलीत सामाजिक कार्य करू लागले. लष्करी शिस्त अंगी असल्याने हाती घेतलेले काम पूर्ण करायचे, ही त्यांची कामाची पध्दत. या कार्य पध्दतीमुळे ते गणेश मंदिराजवळील पादचारी पूल, सारस्वत काॅलनीमधील नागरी प्रश्न मार्गी लागू शकले. हे कार्य करत असताना कल्याण, डोंबिवलीतील विविध रस्त्यांवर कुष्ठ रुग्ण भिक्षा मागून उपजीविका करत असल्याचे, उन, पावसात बसत असल्याचे माने यांच्या निदर्शनास आले. कुष्ठ रुग्णांसाठी त्यांच्या व्याधीवर उपचारा करणारा दवाखाना त्यांच्या भागात सुरू केला. त्यांना त्यांच्या वसाहतीत रोजगाराची साधने उपलब्ध करुन दिली. त्यांना स्वालंबनाने उभे केले तर कुष्ठरुग्ण भिक्षा मागण्यासाठी शहरातील रस्त्यांवर दिसणार नाहीत. असा विचार करुन गजानन माने यांनी पत्रीपुला जवळील हनुमाननगर कुष्ठ रुग्ण वसाहतीत १९९० मध्ये सामाजिक कार्याला सुरूवात केली.
हेही वाचा- ठाणे: उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न
हनुमाननगर कुष्ठ रुग्ण वसाहतीमधील कुष्ठ रुग्णांना यापूर्वी उपजीविकेचे साधन नव्हते. हातभट्टीची दारु तयार करुन ती विक्री करणे एवढेच साधन त्यांच्या जवळ होते. पोलिसांचा छापा पडून सामुग्री नष्ट केली की काही दिवस या मंडळींना ऊपजीविकेचा प्रश्न पडायचा. या गैरधंद्यापासून या मंडळींना दूर ठेवण्यासाठी हनुमाननगर वसाहतीत शिधावाटप दुकान सुरू करुन घेतले. शाळेची व्यवस्था केली. या वसाहतीत कुष्ठ रुग्णांवर नियमित उपचारासाठी पालिकेच्या माध्यमातून दवाखाना सुरू केला. माजी खासदार दिवंगत राम कापसे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगरसेवक कैलास शिंदे यांचे यासाठी सहकार्य मिळाले. वसाहती मधील ४० तरुण मुलांना कल्याण डोंबिवली पालिकेत कामाला लावले. महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. शासन, पालिकेच्या योजनेतून त्यांना शिवणयंत्र उपलब्ध करुन दिली. घराघरात मेणबत्त्या, पणत्या, अगरबत्ती सारखे हस्त कौशल्य व्यवसाय सुरू करुन दिले. या वस्तुंना बाजारपेठ मिळून दिली. घरात या मंडळींच्या कष्टातून पैसे येऊ लागले. त्याचे महत्व या मंडळींना पटून दिले. दारू धंद्यातील पैशापेक्षा हा कष्टाचा पैसा आपल्याला उभारी देईल. आपण समाधानाने राहू शकतो कुष्ठ रुग्ण मंडळींना पटू लागले, असे माने यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, स्वालंबन, रोजगाराची साधने कुष्ठ रुग्ण वसाहतीत उपलब्ध झाली. हळूहळू ही मंडळी भिक्षा मागण्यासाठी शहरात जाण्याचे प्रमाण घटले. किरकोळ अपवाद सोडला तर आता ते पूर्णपणे थांबले आहे, असे पद्श्री गजानन माने यांनी सांगितले.
हेही वाचा- मीरा रोड येथील ‘ब्रँड फॅक्टरी’ला भीषण आग; तीन कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश
व्यवहार शून्य
कोणत्याही परिस्थितीत कुष्ठ रुग्ण वसाहतीचा कायापालट करताना, कुष्ठ रुग्णांच्या उत्थानाचे काम करताना तेथे कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार येणार नाही. कोणाकडून देणग्या, निधी न घेता त्या बदल्यात दात्यांकडून वस्तूरुपाने कुष्ठ रुग्णांना आवश्यक तेवढ्या सुविधा देणे सुरू केले. वसाहतीचे जमीन मालक प्रजापती यांनी या भागात मंदिर बांधले. मंदिरातील महसूल वसाहतीसाठी वापरण्यात येऊ लागला. माजी उपमहापौर राहुल दामले यांच्या कार्यकाळात कुष्ठ रुग्णांना अडीच हजार रुपये मानधन पालिकेकडून सुरू करण्यात आले. रिक्षा परमिट कुष्ठ रुग्ण वसाहतीमधील तरुणांना देण्यात आली. महिला बचत गटांमधून कौशल्याधारित व्यवसाय सुरू केले. जात-धर्म न पाळता हनुमाननगर कुष्ठ रुग्ण वसाहतीत ४०० रहिवासी एकोप्याने राहतात. कष्टाचे मोल त्यांना समजले आहे, असे माने यांनी सांगितले.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा, शिवसेनेतील बंडाळीनंतर प्रथमच ठाण्यात
पालिकेचा ठराव
गजानन माने यांना कुष्ठ रुग्ण सेवेबद्दल पद्मश्री सन्मान द्यावा म्हणून माजी महापौर दिवंगत कल्याणी पाटील, उपमहापौर राहुल दामले यांच्या काळात पालिकेने ठराव करुन तो शासनाकडे पाठविला होता. त्या ठरावाचा पाठपुरावा खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी माने यांच्या कार्याची दखल घेतली. त्यांना पद्मश्री सन्मान जाहीर झाला. अनेक पुरस्कार माने यांना मिळाले आहेत.
हेही वाचा- ठाणे : कोपरी उड्डाणपुलावर आणखी एक मार्गिका सुरू
रुग्णालयाची गरज
ठाणे जिल्ह्यात कुष्ठ रुग्णांसाठी रुग्णालय नाही. ते हनुमान नगर वसाहतीत उभारणीचे काम सुरू केले होते. ५० लाख खर्च या कामासाठी आहे. निधीची अडचण आल्याने फक्त दोन माळे बांधून तयार आहेत. दात्यांनी साहाय्य केले तर हे काम पूर्णत्वाला जाईल, असे माने म्हणाले.
“ कुष्ठ रुग्णांना स्वालंबनाने जगण्यास शिकून त्यांना कष्टातून मिळणाऱ्या कमाईचे मोल काय असते ते शिकवले. या शिकवणीतून कुष्ठ रुग्ण आता स्वकमाईने आपला कुटुंब गाडा चालवित आहे. हीच आपल्या कामाची पावती आणि पद्मश्री सन्माने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापुढे आपले काम सुरूच राहणार आहे, अशी माहिती कुष्ठ रुग्ण सेवक पद्श्री गजानन माने यांनी दिली.