वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी म्हणूनच पोलीस कारवाई करत असतात. यामुळे पोलिसांच्या कारवाईमागची भावना समजून घ्यावी आणि पोलिसांचे मित्र बनून त्यांना साथ द्यावी, असे आवाहन हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रझा मुराद यांनी ठाण्यात नुकतेच केले.
ठाणे वाहतूक पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप कार्यक्रम बुधवारी पोलीस परेड मैदानात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अभिनेते रझा मुराद यांनी नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या परेडचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे लहान वयातच मुलांना देश सेवेची जाणीव निर्माण होत असल्याचे मुराद यांनी सांगितले.
ते म्हणाले, अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव होत असल्याने ही मुले भविष्यात जबाबदार नागरिक बनतील,  मुंबई-ठाण्यात पोलीस विभाग चांगले काम करीत असून नागरिकांनीसुद्धा त्यांना समजून घेतले पाहिजे. वाहतूक पोलीस आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असतात. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन तुमच्या सुरक्षेसाठीच करत असतात. तसेच कायद्याची जाणीव व्हावी यासाठी पोलीस दंड आकारतात.

Story img Loader