ठाणे : माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्त्कालीन अंगरक्षक पोलीस काॅन्स्टेबल वैभव कदम यांनी रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली होती. आव्हाड यांच्या निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात वैभव कदम यांची ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू होती. परंतु कदम यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणात आता लोहमार्ग पोलिसांनी ठाणे पोलिसांना पत्र लिहून चौकशी अधिकाऱ्याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी येण्याची सूचना केली आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याची आता चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना वैभव कदम हे त्यांचे अंगरक्षक होते. २०२० मध्ये समाजमाध्यमावर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानावर ठाण्यातील व्यवसायिक अनंत करमुसे यांना मारहाण झाली होती. या मारहाणीप्रकरणात वैभव कदम यांनाही अटक होऊन त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. गेल्या काही दिवसापासून ठाणे पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानुसार कदम यांना ठाणे पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जात होते. २९ मार्चला अचानक कदम यांनी निळजे ते तळोजा रेल्वे मार्गावर रेल्वेगाडी खाली येऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी कदम यांनी मोबाईलमधील व्हाॅट्सॲपवर स्टेट्स ठेवले होते. ‘पोलीस आणि मीडियाला विनंती आहे की, यात मी आरोपी नाही, एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, मी तणावात हा निर्णय घेत आहे, यात कोणाला दोषी ठरवू नका’ असा त्यामध्ये मजकूर होता.
कदम यांच्या आत्महत्येची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती. तसेच करमुसे मारहाण प्रकरणातील चौकशीमध्ये त्यांना तासन्-तास चौकशीसाठी बसविण्यात येत असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे कदम यांच्यावर कोणता दबाव होता का, वैभव कदम यांनी आत्महत्या का केली यासंदर्भाचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी लोहमार्ग पोलिसांनी एक पत्र ठाणे पोलिसांना पाठविले आहे. कदम यांची चौकशी ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यांना चौकशीसाठी येण्याची सूचना केली आहे. परंतु संबंधित पोलीस अधिकारी चौकशीसाठी अद्यापही गेलेले नाही. त्यामुळे कदम यांच्या आत्महत्येच्या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.