|| आशीष धनगर

बालसाहित्य, मासिकांचा पुरवठा; सुट्टी विशेषांकांचेही प्रकाशन

पूर्वी उन्हाळय़ाची सुट्टी म्हटलं की, हिंडण्या-बागडण्यासोबतच छान छान गोष्टींची पुस्तके हेही लहान मुलांचे सुट्टीतील विश्व असायचे. काळानुरूप पुस्तकांकडे असलेला मुलांचा ओढा कमी होऊन टीव्ही आणि मोबाइल यात ते गुरफटत चालले आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ठाणे, डोंबिवली, बदलापूर शहरांतील वाचनालयांनी लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी पुन्हा रुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उन्हाळय़ाच्या सुट्टीत या वाचनालयांतर्फे लहान मुलांसाठी बालसाहित्य आणि बालमासिके उपलब्ध करून दिली जात असून काही व्यवस्थापनांनी तर यंदा सुट्टी विशेषांकही काढले आहेत.

मोबाइल आणि टीव्ही यांचे मुलांमधील आकर्षण वाढू लागले आहे. सहाजिकच यामुळे मुलांमधील वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. हे चित्र बदलण्यासाठी ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर या शहरातील वाचनालयांनी पुढाकार घेतला आहे. या मे महिन्याच्या सुट्टीत मुलांना साहित्यक्षेत्राकडे वळण्यासाठी अनेक वाचनालयांतर्फे बालविभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागामध्ये मुलांसाठी चंपक, चांदोबा आणि टकटक या मासिकांसोबतच गूढ कथांची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या बालविभागात लहान मुलांसाठी ५ हजार पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी दररोज मुले आणि त्यांचे पालक भेट देत असल्याचे ठाणे मराठी ग्रथसंग्रहालयाचे अनिल ठाणेकर यांनी सांगितले.

डोंबिवलीच्या पै लायब्ररी तर्फे यंदा बालवाचकांसाठी फन-डू हा विशेषांक तयार करण्यात आला आहे. या विशेषांकात इंग्रजी आणि मराठी भाषांमधील लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती आणि इंटरनेट आणि मोबाइलची माहिती देणार लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तर काही बाल लेखकांच्या लेखाचा समावेश करण्यात आला असून आत्तापर्यंत या विशेषांकाच्या अडीच हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली असल्याचे पांडुरंग पै यांनी सांगितले. तसेच बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयातर्फे सुट्टीनिमित्त मोफत बालवाचनालय सुरू करण्यात आले आहे. वाचनालयाचा बाल विभाग हा जूनपर्यंत सुरू राहाणार असून यामध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेतील दोन हजार पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकांमध्ये ३ वर्ष ते १६ वर्षांपर्यंत वयोगटासाठीच्या मुलांसाठीच्या गूढ कथा, गोष्टी आणि गाण्यांची पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

ज्याप्रमाणे बँकेत पैशांचे व्यवहार चालतात, त्याचप्रमाणेच ग्रंथालयाच पुस्तकांची देवाण घेवाण कशी होते, याचे माहिती मुलांना व्हायला हवी. या उद्देशाने वाचनालयातर्फे बालविभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण होईल.     – शाम जोशी  संस्थापक, ग्रंथसखा वाचनालय, बदलापूर