कल्याण : कणकवलीतील बिरवाडी गावच्या रहिवाशाची डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर सात वर्षापूर्वी हत्या करणाऱ्या डोंबिवलीतील एका सराईत गुन्हेगाराला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. एस. गोरवाडे यांनी जन्मठेपेची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. दंडाची रक्कम भरणा केली नाही तर आणखी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले. महेंद्र दळवी (५०, रा. बिरवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) असे मयताचे नाव आहे. संदीप जोगिंदर झा उर्फ बाटल्या (३०) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. बाटल्याला यापूर्वी दोन वेळा शिक्षा झाल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. सचिन कुलकर्णी यांनी बाजू मांडली. रामनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश यादव (निवृत्त) यांनी तपास केला होता. या प्रकरणात न्यायालय आणि पोलीस ठाणे समन्वयक म्हणून हवालदार तेजश्री शिरोळे, बी. एम. चव्हाण, आदेश बजावणी एस. ए. खैरनार, ए. के. कोळी यांनी महत्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ निरीक्षक सचिन सांडभोर, निरीक्षक समशेर तडवी, सुरेश सरडे यांनी मार्गदर्शन केेले.समन्वयक अधिकारी हवालदार तृप्ती शिरोळे यांनी सांगितले, महेंद्र दळवी हे कोकणातील बिरवाडी गावचे रहिवासी. त्यांची बहिण डोंबिवलीत राहते. बहिणीच्या घरात मुलाचे लग्न असल्याने ते सात वर्षापूर्वी डोंबिवलीत लग्न सोहळ्यासाठी आले होते. रात्रीच्या वेळी भोजन झाल्यानंतर महेंद्र बहिणीच्या घरातून बाहेर पडले. शहर परिसरात फिरून झाल्यावर ७ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री सव्वा बारा वाजता ते डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅक वरुन एकटेच बहिणीच्या घरी चालले होते.

हेही वाचा : ठाणे स्थानक परिसराला राजकीय आखाड्याचे रूप ; भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

यावेळी स्कायवाॅकवर आरोपी संदीप बाटल्या याने त्यांना अडविले. आणि त्यांच्या जवळ पैसे देण्याची मागणी केली. आपल्या जवळ पैसे नाहीत. आपण पाहुणे म्हणून डोंबिवलीत आलो आहे, असे सांगुनही संदीप झा ऐकण्यास तयार नव्हता. बाटल्या दारुच्या नशेत होता. त्याने महेंद्र यांच्या खिसे तपासले. त्यात त्याला काही आढळून आले नाही. महेंद्रकडून आपणास पैसे मिळण्याची खात्री नाही पटल्यावर बाटल्याने जवळील धारदार चाकुने महेंद्र दळवी यांच्यावर वार केले. ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. बराच उशीर ते पडून राहिल्याने आणि अति रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच मरण पावले. रामनगर पोलिसांनी महेंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्या जवळ रहिवास, नावाचा पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात इसमाचा मृत्यू म्हणून नोंद केली होती.

हेही वाचा : ठाणे : भिवंडीत पाच वर्षांची मुलगी वाहून गेली

महेंद्र घरी आला नाही म्हणून त्याच्या बहिणीच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली होती. रामनगर पोलिसांनी महेंद्र दळवी यांच्या चेहऱ्याची छायाचित्रे काढून ती शहराच्या विविध भागात लावली होती. ही छायाचित्रे पाहून महेंद्रचे नातेवाईक रामनगर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी महेंद्रला ओळखले. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी आरोपी बाटल्याला अटक केली होती. कल्याण न्यायालयात हे प्रकरण सात वर्ष सुरू होते. न्यायालयाने या प्रकरणात एकूण सात साक्षीदार आणि एक प्रत्यक्ष साक्षीदार तपासला. प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने बाटल्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment dombivali innkeeper who killeda resident kankavli kalyan news tmb 01
Show comments