कल्याण- अंबरनाथ येथील एका महिलेची पैशाच्या हव्यासापोटी तीन विद्यार्थ्यांनी घरात घुसून १० वर्षापूर्वी हत्या केली होती. या हत्या प्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर. जी. वाघमारे यांनी दोन उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.वाणीज्य शाखेचे पदवीधर असलेला वीरेंद्र अजय नायडू (३२), एमबीएची विद्यार्थीनी अश्विनी सिंग (३२) आणि एक १७ वर्षाचा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी या हत्या प्रकरणात आरोपी होते. न्यायालयाने वीरेंद्र, अश्विनी यांना जन्मठेपेची आणि पाच हजार रुपये दंडाची, याच दंड संहितेच्या खून आणि दरोड्याच्या कलमाखाली १० वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. सचिन कुलकर्णी, ॲड. संजय गोसावी यांनी बाजू मांडली. अंबरनाथ मधील स्नेहल उमरोडकर या पती, मुलासह राहत होत्या. दहा वर्षापूर्वी त्या घरात एकट्या असताना त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्नेहल यांचा मुलगा आदित्य यांच्या मित्राने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने ही हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. पोलिसांनी तिन्ही विद्यार्थ्यांना अटक केली होती. एक विद्यार्थी अल्पवयीन होता.
हेही वाचा >>>ठाण्यात विज्ञान केंद्र स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपक्रम केंद्र
आरोपी वीरेंद्र महाविद्यालयात असताना सतत नापास होत होता. पुढच्या वर्गात जाणे गरजेचे असल्याने गुण बदलण्यासाठी लाचेची रक्कम जमा होणे गरजेचे होते. तेवढी रक्कम जवळ नसल्याने आरोपी वीरेंद्र आणि त्याच्या दोन साथीदारांनी आदित्यची आई स्नेहल हिची हत्या करुन तिच्या अंगावरील दागिने चोरुन नेण्याचा कट रचला. वीरेंद्र हा स्नेहल कुटुंबीयांचा कौटुंबिक मित्र होता. त्याला स्नेहल यांच्या घरातील सगळी माहिती होती.
हत्येच्या दिवशी वीरेंद्रने मित्र आदित्य याच्याशी संवाद साधून तो स्वत, त्याचे वडील दिवसभरात कुठे असतील याची माहिती काढली. त्याप्रमाणे स्नेहल यांची हत्या करण्याचे ठरविले. स्नेहल घरात एकट्या असतानाच तिन्ही आरोपी स्नेहल यांच्या घरात घुसले. त्यांनी स्नेहल यांना मारहाण करत त्यांचे तोंड घट्ट बांधून घेतले. त्यांची गळा चिरून हत्या केली. गळ्यातील मंगळसूत्र चोरुन नेले.
हेही वाचा >>>VIDEO: अंगावर धावून जात शर्ट खेचत मनपा अभियंत्याला मारहाण का केली? भाजपा आमदार म्हणाल्या, “कारण…”
स्नेहल यांचे पती विवेक रात्री घरी आले तेव्हा त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतशिंदे (आता उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर) हवालदार दादाभाऊ पाटील, साहेबराव पाटील यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात न्यायालय समन्वयक म्हणून साहाय्यक उपनिरीक्षक नंदकुमार कदम, पी. के. सांळुखे यांनी काम पाहिले.