ओळख लपविण्यासाठी अज्ञात व्यक्तीचे शीर धडापासून वेगळे; मृतदेह घरातच जाळला
एका अनोळखी व्यक्तीचे शीर धडापासून वेगळे करणारा आणि तो मृतदेह स्वत:चा असल्याचे भासविणाऱ्या मुस्सदिक शेख याला गुरुवारी ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो घाटकोपरमधील बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्य़ात आरोपी होता आणि यामुळे त्याने स्वत:ची ओळख लपविण्यासाठी हा प्रकार केला होता, अशी माहिती मुख्य जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्य़ातील मीरारोड भागात मुस्सदिक शेख (६१) राहात होता. २००३ मध्ये त्याच्या घरात एक मृतदेह जळत असल्याची माहिती मीरारोड पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणी पाहणी केली होती. त्यामध्ये मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करण्यात आल्याचे पोलिसांना आढळले होते. त्या मृतदेहाचे शीर त्या ठिकाणी सापडले नव्हते. तसेच मुस्सदिक हा शेजाऱ्यांच्या नजरेस पडला नव्हता. मुस्सदिकच्या घरात ही घटना घडली असल्यामुळे त्याचाच हा मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त होत होती. मुस्सदिकच्या घराशेजारीच त्याचा भाऊ राहात होता. त्यानेही हा मृतदेह मुस्सदिक याचा असल्याचा अंदाज वर्तविला होता. अखेर पोलिसांनी तपासाअंती मुस्सदिकचा मृतदेह असल्याचे मान्य करत तो त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता. दरम्यान, सात वर्षांनंतर म्हणजेच मुस्सदिक हा जिवंत असून तो मालेगाव भागात राहात असल्याची माहिती मीरारोड पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पथकाने मालेगावात जाऊन त्याला अटक केली होती. तो घाटकोपरमधील बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्य़ात आरोपी होता आणि यामुळेच स्वत:ची ओळख लपविण्यासाठी त्यानेच हा प्रकार केल्याचे उघड झाले होते, अशी माहिती मुख्य जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे यांनी दिली. त्याच्या घरामध्ये सापडलेला मृतदेह कुणाचा होता, हे मात्र तपासात स्पष्ट होऊ शकले नव्हते. दरम्यान, याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील लोंढे यांनी न्यायालयापुढे सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य़ मानून न्यायाधीशांनी मुस्सदिकला जन्मठेप सुनावली.