ठाणे : शहरात निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा जिम्नॅस्टीक्सच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडली जाणार आहे. तर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मल्लखांबच्या प्रात्यक्षिकेतून मानवंदन दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत संस्कृती, परंपरा जपण्यासह विविध प्रात्यक्षितांच्या मार्फत इतिहास उलगडला जाणार असल्याचेही चिन्हे आहेत.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा २५ वे वर्ष आहे. यानिमित्त श्रीकौपिनेश्वर मंदिराच्या आवारात सोमवारी बैठक पार पडली. यावेळी विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यंदाच्या यात्रेत संविधान विषयावर तसेच विविध समाजाची संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ सर्वाधिक पाहायला मिळणार असल्याचे चिन्हे आहेत. त्यासह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चरित्ररथ देखील यंदा यात्रेत पाहायला मिळणार आहे. तसेच एकलव्य क्रिडा मंडळच्यावतीने मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली जाणार असून या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना देणार असल्याचे किशोर म्हात्रे यांनी सांगितले. तर, दाक्षम जिम्नॅस्टीक्सची १०० मुले जिम्नॅस्टीक्सच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनकथा उलगडणार आहेत.

इतर संस्थांचा असा असणार सहभाग

आरएमआर या समुहाच्यावतीने राम मारुती रोडवरील तीन ते चार सोसायटी एकत्रित येऊन गणपती, लक्ष्मी, सरस्वती यांचा देखावा असणारा चित्ररथ गजानन महाराज चौकात ठेवणार आहेत. तसेच यात्रेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या कपाळावर त्यांच्या वतीने चंद्रकोर काढून देणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या वतीने तणावमुक्ती या विषयाला धरुन ध्यानधारणावर आधारीत चित्ररथ असणार आहे. ठाणे वकील संघटनेचा चित्ररथ, महिलांची बाईक रॅली, आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने केंद्र सरकारच्या फिट इंडिया चळवळी अंतर्गत फिट रहा, हिट रहा हा संदेश सायकल रॅलीच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर, समर्थ भारत व्यासपीठातर्फे चालविण्यात येणाऱ्या वस्ती विकास प्रकल्पातील ८०० मुलांचा सहभाग असलेला चित्ररथ यामध्ये सहभागी होणार आहे. मराठा मंडळांच्यावतीने ‘संविधान आणि मी’ या विषयावर चित्ररथ पाहायला मिळणार आहे.

टीसाचा यंदा स्वागत यात्रेत सहभाग

ठाणे शहरातील स्वागत यात्रेला यंदा रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर यंदा यात्रेसोबत शहरातील नवनविन संस्था जोडल्या जात आहेत. यातच, ठाणे लघु उद्योग संघटना (टीसा) या संस्थेला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने टीसा यंदा प्रथमच स्वागत यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती टीसाचे भावेश मारु यांनी सोमवारी पार पडलेल्या स्वागत यात्रा बैठकीत दिली.

Story img Loader