डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील एका बेकायदा इमारतीच्या मजल्यांवर सिमेंट, विटा, सिमेंट गिलावा वाहून नेण्यासाठी एक उद्वाहन रस्त्याच्या बाजुला आणि इमारती लगत उभी करण्यात आले आहे. अतिशय धोकादायक स्थितीत हे उद्वाहन उभे असल्याने वादळी वारा आला तर कोसळण्याची भीती पादचारी, वाहन चालक, परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
हे उद्वाहन पालिका अधिकाऱ्यांनी तातडीने काढून टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. चाळीस ते पन्नास फूट उंच असलेले हे उद्वाहन इमारती लगत उभे करण्यात आले आहे. बेकायदा इमारतीला सिमेंट मध्ये वाळू ऐवजी खडकाचा चुरा (ग्रीट) वापरले जाते. खडकाचा चुरा सिमेंटला घट्ट पकडून ठेवत नाही. बेकायदा बांधकामे झटपट उभी करायची असल्याने आणि वाळू महाग असल्याने ती परवडत नाही. त्यामुळे भूमाफिया खडकाचा चुरा सिमेंटमध्ये वापरुन इमारत बांधकामे करत आहेत. अशा इमारतींच्या कामासाठी अवजड मालवाहू उद्वाहन उभे केले जाते.
अशाप्रकारचे उद्वाहन डोंबिवलीतील देवीचापाडा येथील काळुबाई मंदिरा जवळील एका सात माळ्याच्या बेकायदा इमारतीजवळ उभे करण्यात आले आहे. रस्त्या लगत हे अवजड उद्वाहन उभे करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून उभे असलेले उद्वाहन वादळी वारा आला तर कोसळण्याची भीती परिसरातील नागरिक, वाहन चालक व्यक्त करतात. गावदेवी ते सत्यवान चौक हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. पावसाचे दिवस सुरू होत आहेत. मोसमी पावसाचे पहिले दिवस वादळी असतात. अशा परिस्थितीत नागरी दाटीवाटीच्या वस्तीत उभ्या असलेल्या बेकायदा इमारतीच्या उद्वाहनाला वादळी वाऱ्याचा झटका बसला तर ते कोसळण्याची भीती बांधकाम क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
पालिकेने काळुबाई मांढरा देवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीचे मालवाहू उद्वाहन तातडीने काढून टाकावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याविषयी उघड बोलले तर भूमाफिया त्रास देतील या भीतीने परिसरातील नागरिक उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. पालिका आयुक्तांनी ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकाऱ्यांना दिेले आहेत.