अंबरनाथमध्ये इमारतीची उदवाहिका दुसऱ्या मजल्यावरुन कोसळून झालेल्या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ पूर्वेतील निलयोग नगर भागात असलेल्या अनिता इमारतीत हा प्रकार घडला. जखमी सात महिलांपैकी दोन महिलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अंबरनाथच्या पूर्व भागात निलयोग नगर परिसरात अनिता इमारत आहे. इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरात नृत्याच्या सरावासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावरून परतत असताना उदवाहिकेत सात महिला शिरल्या. यावेळी उदवाहिका अतिशय वेगात खाली येऊन कोसळली. कोसळणाऱ्या उदवाहिकेचा वेग इतका प्रचंड होता की उदवाहिका खाली कोसळताच दोन महिलांचे पाय जागीच मोडले. तर इतर महिलांनाही किरकोळ इजा झाल्या.
नव्या इमारतीत उदवाहिकेत बिघाड झालाच कसा?
या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर सोसायटीतल्या रहिवाशांनी तिथे धाव घेत त्यांना बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही इमारत अतिशय नवीन असून उदवाहिका खराब होण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र उदवाहिकेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त महिला शिरल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. याबाबत या महिलांना सोसायटीतील सदस्यांनी यापूर्वीही दोन वेळा समज दिली होती, असेही कळते आहे. मात्र, तरीही क्षमतेपेक्षा जास्त महिला एकाच वेळी उदवाहिकेत गेल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.