डोंबिवली – गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे जिन्याकडे सरकणारे उद्वाहन बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे. उद्वाहन सुरू करा म्हणून अनेक प्रवाशांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नाही, असे प्रवाशांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ फलाट क्रमांक पाचच्या बाजूने पाटकर रस्त्याच्या एका बाजूला प्रवाशांना स्कायवाॅकवर जाण्यासाठी, रेल्वे स्थानकात जाण्यासाठी कल्याण दिशेने एक उद्वाहन आहे. एकावेळी १० प्रवासी या उद्वाहनाने येजा करतात. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी उद्वाहनाच्या तळाला गेल्याने तेथील विद्युत यंत्रणा बंद पडली आहे.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांवर खड्डे

पाटकर रस्ता, नेहरू रस्ता, डाॅ. राॅथ रस्ता भागात मुसळधार पाऊस पडला की या भागातील भुयारी गटार अरुंद असल्याने त्याची सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. अनेक वर्षे पालिकेकडून या भुयारी गटाराची डागडुजी त्याची क्षमता वाढविण्याचे काम केले नाही. अर्धा ते एक तास मुसळधार पाऊस पडला की डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात दोन ते तीन फूट पाणी तुंबते. हे पाणी परिसरातील व्यापारी गाळे, दुकानांमध्ये जाते. याच रस्त्यावर रेल्वेचे उद्वाहन आहे. हे उद्वाहन मुसळधार पावसात एक ते दोन फूट पाण्यात जाते. यामधील विद्युत यंत्रणा ठप्प पडते. मागील दोन वर्षापासून प्रवासी हा अनुभव पावसाळ्यात घेतात. गेल्या १५ दिवसांपासून विद्युत यंत्रणा बंद असल्याने त्याची दुरुस्ती रेल्वेकडून केली जात नसल्याने उद्वाहन बंद असल्याचे कळते. आम्ही या बंद उद्वाहनाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. ही कामे वरिष्ठ पातळीवरून केली जातात, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – सत्तेतील ‘दादा’प्रवेशाने ठाण्यात भाजप खुशीत

उद्वाहन बंद असल्याने त्याचा गैरफायदा फेरीवाले घेत आहेत. या उद्वाहनाच्या समोर फेरीवाले ठाण मांडून बसतात. प्रवाशांना जिन्यांची चढउतर करून मग रेल्वे स्थानकात किंवा डोंबिवली पश्चिमेत जावे लागते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना जिने चढण्याचा त्रास होतो म्हणून नेहरू रस्त्याने ठाकुर्ली उड्डाण पुलावरून पायी पश्चिम भागात जातात, असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.