ठाणे : वृक्षांवरील विद्युत रोषणाईबाबत मुंबई उच्च् न्यायालयाने फटकारले असतानाही ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरूच असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेकडून प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविली जात असताना ठाणे जिल्ह्यामध्ये याकडे डोळे झाक होत असल्याची टिका पर्यावरणवादी कार्यकर्ते करत आहेत.
मुंबई, ठाणे आणि महानगर क्षेत्रात सण- उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. परिसर आकर्षित दिसावा म्हणून रस्त्यालगत असलेल्या वृक्षांच्या खोडांवर आणि फाद्यांवरही रोषणाई केली जात आहे. हा प्रकार मागील काही वर्षांपासून वाढू लागला आहे. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होतो. अनेकदा तारांमध्ये बिघाड होऊन वृक्षांना आगी लागतात. वृक्षांवर सूक्ष्म, मोठ्या आकाराचे किटक असतात. त्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. ठाणे जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना रोषणाईमुळे दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही. असे असतानाही ठाणे, नवी मुंबई, मुंबई, मिरा भाईंदर भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरू होती. याबाबत काही महिन्यांपूर्वी ठाणे स्थित पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहीत जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्या मार्फत जनहीत याचिका दाखल केली होती. ही बाब जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत महापालिकांना फटकारले होते. तसेच राज्य सरकारसह मुंबई, ठाणे, आणि मिरा भाईंदर महापालिकेला नोटीस बजावली होती.
हेही वाचा : मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
उच्च न्यायालयाने नोटीस बजावूनही ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर महापालिका ढिम्म असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील तलावपाली भागात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तलावपाली परिसरात वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठाण्यात दिवाळी, दसरा किंवा सण-उत्सवांच्या कालावधीत तलावपाली, उपवन भागात वृक्षांवर रोषणाईचे प्रकार सुरूच असतो. मिरा भाईंदर येथेही चैत्र नवरात्रौत्सवा निमित्ताने वृक्षांवर रोषणाई करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही उपाहारगृह, ढाबे परिसरात व्यवसायिकांनी वृक्षांना प्रकाश रोषणाई करून विद्रुपीकरण केले आहे.
हेही वाचा : मुंबईतील दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; मुंबई, ठाणेकरांची आजही होरपळ
उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतर मुंबई महापालिकेने वृक्षांवर असलेली विद्युत रोषणाई काढली आहे. परंतु ठाणे जिल्ह्यात अद्यापही कारवाई झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही महापालिकेचे डोळे उघडले नाही. ठाणे आणि मिरा भाईंदर महापालिकेविरोधात नोटीस पाठविणार आहे.
रोहीत जोशी, याचिकाकर्ते.
यासंदर्भात ठाणे महापालिकेचे वृक्ष अधिकारी केदार पाटील यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
पालिका हद्दीतील झाडांना प्रकाश रोषणाई, खिळे ठोकून जाहिराती लावणे आणि इतर प्रकार करून इजा करणाऱ्यांवर मालमत्ता विरूपण प्रतिबंध आणि हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे फौजदारी गुन्ह्याची कारवाई केली जाणार आहे.
संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक, कल्याण डोंबिवली महापालिका.