डोंबिवली – येथील पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या बाजीप्रभू चौकात एमआयडीसी बस निवाऱ्याच्या बाजूला पालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ रिक्षांमध्ये बसून काहीजण दररोज मद्यपान करतात. या मद्याचा घमघमाट परिसरात पसरतो. स्वच्छता गृहात जाणारे महिला, पुरुष नागरिक हा सगळा प्रकार पाहून हैराण आहेत.
बाजीप्रभू चौकात कल्याण भागात जाणाऱ्या रिक्षा चालकांचे वाहनतळ आहे. या वाहनतळावरील काही रिक्षा सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाजूला उभ्या केल्या जातात. या सहा ते सात रिक्षांमध्ये बसून काहीजण बिनधास्तपणे मद्यपान करत असतात. एमआयडीसी निवाऱ्यावर उभे असणारे प्रवासी, स्वच्छतागृहात जाणारे पादचारी हा सगळा गैरप्रकार पाहत असतात. उघड्यावर मद्यपान करून ही मंडळी पोलिसांना आव्हान देत आहेत. पोलिसांना हा प्रकार माहिती आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत.
हेही वाचा – डोंबिवलीतील दिव्यांगाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे देण्यासाठी धमकी
हेही वाचा – २८ हजार राख्या घेऊन डोंबिवलीतील तरुण दुचाकीवरुन कारगिलला
पोलिसांनी बाजीप्रभू चौकात स्वच्छतागृहाजवळ सायंकाळच्या वेळेत उभ्या करण्यात येणाऱ्या रिक्षा चालकांवर पाळत ठेऊन हा मद्याचा अड्डा बंद करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. स्वच्छतागृहासमोरील रस्ता अडवून रिक्षा उभ्या केल्या जातात. यामुळे नागरिकांचा स्वच्छतागृहाकडे जाणारा रस्ता बंद होतो. पालिकेतील आधारकेंद्रात अनेक नागरिक आधार कार्डच्या कामासाठी आलेले असतात. त्यांनाही हा प्रकार पाहून धक्का बसत आहे. काही नागरिक चहापानासाठी येथे येतात. त्यांनाही हा प्रकार पाहून आश्चर्य वाटत आहे. याविषयीची पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस पहिले तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलवितात. त्यामुळे आम्ही हा सगळा प्रकार दररोज पाहूनही तक्रार करू शकत नाहीत, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले. या भागातील दुकानांमधील अनेक महिला कर्मचारी स्वच्छतागृहात येजा करतात. त्यांनाही रिक्षेत सुरू असलेल्या मद्यपानाविषयी घृणा आहे. रामनगर पोलिसांनी या भागात पाळत ठेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.