१३५०० रुपयांचा परवाना न घेतल्यास कारवाई * येऊरमधील पार्टीबहाद्दरांना व्यक्तिगत परवान्याची सक्ती
नववर्षांच्या निमित्ताने गृहसंकुले, इमारती यांच्या आवारात किंवा गच्चीवर मद्यपाटर्य़ा करणाऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची चिन्हे आहेत. ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील वसाहतींमध्ये मद्यपाटर्य़ाच्या आयोजन करणाऱ्यांना १३ हजार ५०० रुपयांचा परवाना घेण्याची सक्ती राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. तसेच असा परवाना न घेता पार्टी करणाऱ्यांवर कडक कारवाईदेखील करण्यात येणार आहे. सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी ठाण्याजवळील येऊरच्या जंगलातील हॉटेल किंवा बंगल्यांकडे धाव घेणाऱ्यांची येऊरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कडक तपासणी केली जाणार असून व्यक्तिगत परवान्याशिवाय मद्य बाळगणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नववर्ष स्वागताचे औचित्य साधत अनेक वसाहतींमध्ये विवीध स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. काही ठिकाणी खेळही आयोजित केले जातात. लहान मुले आणि महिलांसाठी विवीध स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना मद्यप्रेमींसाठी वसाहतीमधील इमारतींच्या गच्चींवर ‘खास’ कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. अनेक वसाहतींमध्ये हा कार्यक्रम जणू ठरलेला असतो. त्यासाठी दिवाबत्तीची व्यवस्था करुन जय्यत तयारीही केले जाते. मात्र, यंदा अशा गच्चीवरील पाटर्य़ासाठीही परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेले येऊरचे जंगल पार्टीप्रेमींसाठी मोक्याचे ठिकाण मानले जाते. दाट जंगलामध्ये मद्याचे प्याले रिचविणे तळीरामांना परमोच्च आनंद मिळवून देत असतो. त्यामुळे पोलिसांची नजर चुकवून येऊर गाठण्याकडे अनेकांचा कल असतो. नवीन वर्ष स्वागत पाटर्य़ासाठी मोठय़ा प्रमाणावर नागरिक येऊर येथील हॉटेल्स, बंगले या ठिकाणी गर्दी करतात. गेल्या काही वर्षांत नवीन वर्ष स्वागत पाटर्य़ाच्या निमित्ताने येऊर गावात रात्री उशिरापर्यंत मद्य प्राशन करुन बेधुंदपणे नाचगाणी करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.
प्रवेशद्वारावर बंदोबस्त
या पाटर्य़ावर अंकुश ठेवण्यासाठी येऊर गावाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर प्रशासनाचा कडक बंदोबस्त असणार आहे. येऊर येथील मधुबन, मातारखिंड, डिएसपी आणि मानपाडा प्रवेशद्वार येथे वन विभाग, पोलीस यंत्रणा, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नागरिकांकडील वस्तुंची, वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.

Story img Loader