शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबरनाथ शहर पदाधिकाऱ्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात शहरप्रमुखपदी श्रीनिवास वाल्मिकी याची निवड करण्यात आली आहे. तर उपजिल्हा प्रमुखपदावर विजय पवार यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी हे नुकतेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झालेल्या माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे खुद्द खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील शहर शाखा ठाकरे गटाच्या ताब्यात आहे.
हेही वाचा >>>ठाणे: कार घेऊन दरोडा करण्यासाठी आलेल्यांचा प्रयत्न फसला
अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यानंतर अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले.बाळासाहेबांची शिवसेनेला मान्यता मिळाल्यानंतर काही पदाधिकारी शिंदेंच्या समर्थनार्थ आले. यात माजी नगराध्यक्ष आणि शहप्रमुख अरविंद वाळेकर आणि त्यांच्या कुटुंबातील माजी नगरसेवकांचाही समावेश होता. मात्र यावेळी त्यांचे अनेक निकटवर्तीय माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच राहणे पसंत केले. नेते आले मात्र कार्यकर्ते आले नाहीत, अशी चर्चा याप्रसंगी शहरात रंगली होती. यापूर्वीच्या शिवसेनेत असलेले दोन्ही गट एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आल्यानंतर अंबरनाथ शहराची बाळासाहेबांच्या शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर कार्यकारिणी घोषीत करण्यात आली आहे. यात ज्येष्ठ माजी नगरसेवक विजय पवार यांची उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शहरप्रमुखपदी श्रीनिवास वाल्मिकी यांची निवड करण्यात आली आहे. मात्र या निवडी वेगळ्या अर्थाने चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. कारण ठाकरे गटाच्या कार्यकारिणीत निवडले गेलेले पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झालेल्या अरविंद वाळेकर यांची निकटवर्तीय आहेत. विजय पवार आणि श्रीनिवास वाल्मिकी वाळेकर यांचे जवळचे मानले जातात. तर उपशहप्रमुखपदावर निवडललेले गेलेले राजेश शिर्के, अरविंद मालुसरे आणि पद्माकर दिघे हेसुद्धा वाळेकर यांच्या गटातील मानले जातात. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा >>>चार महिन्यात १९५ कोटी मालमत्ता कर वसुलीचे आव्हान ;‘कडोंमपा’ची मागील आठ महिन्यात १८० कोटी वसुली
शाखेवर ठाकरे गटाचे वर्चस्व
सोबतच खुद्द मुख्यमंत्री पुत्र खासदार, आमदार, माजी नगराध्यक्ष, सर्वाधिक नगरसेवक आणि पदाधिकारी हे जरी बाळासाहेबांच्या शिवसेनेत असले तरी अंबरनाथ पूर्वेतील शहर शाखेवर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. या नियुक्तांनंतर पदाधिकाऱ्यांनी शाखेतच जल्लोष साजरा केला. त्यामुळे शिवसेना शहर शाखा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हातून गेल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
माजी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे निकटवर्तीय असताना झालेल्या निवडीबाबत नवनियुक्त शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांना विचारले असता, आम्ही सर्वांचे जवळचे होतो. आज आम्ही मुळ शिवसेनेत आहोत, ते दुसऱ्या गटात गेले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लवकरच जिल्हाप्रमुख शहर शाखेत येतील आणि मी पद स्विकारेल असेही वाल्मिकी यांनी सांगितले.