लहान मुलांना बोलते करण्यासाठी मराठी भाषेत किमान दहा वाक्ये तरी मुलांसमोर बोलणे गरजेचे आहे. वाचन संस्कृतीसोबत श्रवण संस्कृती लहान मुलांमध्ये रुजायला हवी. लहान मुलांविषयी साहित्य लिहिताना मोठी माणसे मुलांच्या भावविश्वात जाऊन लिहितात. मात्र यातून लहान मुलांना नेमके काय सांगायचे आहे याचा बोध होत नाही. चित्र, पक्षी याव्यतिरिक्त लहान मुलांच्या वेगळ्या अपेक्षा असतात हे समजून घ्यायला हवे. यासाठी लहान मुलांना लेखनाची सवय करायला हवी असे मत शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांनी व्यास क्रिएशन्स प्रकाशित निवेदिका धनश्री लेले यांच्या ‘सोनचाफ्याची फुले’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. प्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांच्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी सहयोग मंदिर येथे पार पडला. रेणूताई आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
लेले यांनी वृत्तपत्रात लिहिलेल्या ललित लेखांचे संकलन सोनचाफ्याची फुले या पुस्तकात करण्यात आले आहे. अलीकडे घरात श्यामची आई हे पुस्तक संग्रही नसते. घरात असले तरी लहान मुले ते पुस्तक वाचण्याची शक्यता फार कमी दिसून येते. यासाठी हे पुस्तक पुन्हा नव्याने लिहिण्याची गरज आहे, असे मत दांडेकर यांनी व्यक्त केले. सोप्या भाषेत लिहिणे कठीण, मात्र अनुभवांचा उणेपणा नसल्यास शब्दांची कमतरता भासत नाही. चिखलदरा येथील काही प्रसंग उलगडत जिथे पुस्तके नसतात, ते वाचू शकत नाहीत; पुस्तके असतात तिथे ती वाचली जात नाहीत, जिथे अनुभव आहे तिथे लिहिले जात नाही आणि जिथे लिहिले जाते तिथे व्यासपीठ मिळत नाही, अशी वाचन आणि लेखन संस्कृतीबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली. अभिनेत्री पल्लवी केळकर यांनी पुस्तकातील काही लेखांचे अभिवाचन केले. तसेच निवेदनाच्या शैलीप्रमाणे सोपे लेखन केलेले आहे. संतरचनांना बोलके करत मांडलेली शब्दचित्रे आहेत; वाचकाच्या वैयक्तिक आठवणी जागे करणारे लेख लिहिलेले आहेत, असे सुधीर गाडगीळ यांनी लेखांविषयी बोलताना सांगितले. या वेळी निवेदक राजेश पाटणकर, व्यास क्रिएशनचे नीलेश गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.