ठाणे – आकार ओळख, रंग ओळख, चांगल्या सवयी, भाजी, फळे आणि फुलांची नावे, मानवी भावना अशा विविध संकल्पना खेळांशी जोडत ठाण्यातील सरस्वती मंदिर शाळेत चिमुकल्यांची ‘पायाभूत साक्षरतेची जत्रा’ भरली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर अधिक भर देण्याचा प्रयत्न या जत्रेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामध्ये भाषा, गणित आणि परिसर या विषयावर आधारीत खेळ विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहाय्याने मांडले.
ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्व देत असल्याचे पाहायला मिळते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारीक ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने विविध उपक्रम शाळेत होत असतात. यामध्ये घरगुती खर्चाचे नियोजन करणे, शाळेतील अर्थसंकल्प, विज्ञान विषय उपक्रम होत असतात. त्याचबरोबर आता तीन ते चार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित आणि परिसर अभ्यासाचे धडे मिळावे याकरिता ‘पायाभूत साक्षरतेची जत्रा’ हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या जत्रेत भाषाविकास, परिसर आणि संख्याज्ञान या घटकांवर आधारित विविध खेळ तयार करण्यात आले होते. चिमुकले हे खेळ पालकांच्या मदतीने तयार करून इतरांना समाजावून सांगत होती. या प्राण्यांमधील लहान मोठे कोण, आकाराची ओळख, चांगल्या सवयी, रंगांची ओळख, भाजी, फळे आणि फुलांची ओळख, पौष्टिक खाऊ, प्राणी आणि त्यांचे घर, मानवी भावनांची ओळख, सावली ओळख, अवयव ओळख असे विविध खेळ मांडण्यात आले होते.
शाळा आणि विद्यार्थ्यांच्या घराला जोडणारा कामाचा कोपरा
शाळा आणि घर यांना जोडणारा कामाचा कोपरा हा उपक्रम शाळेत राबवला जातो. या उपक्रमांतर्गत शाळेत शिक्षक काही खेळ शिकवतात. तेच खळ घरातील कामाचा कोपरा येथे देखील तयार केले जातात.
या जत्रेत सर्व मुल आणि पालक उत्स्फूर्त पणे सहभागी झाले. असे विविध उपक्रम शाळा वर्षभर राबवत असते. हे या उपक्रमाचे पहिले वर्ष आहे. मुलांसोबत आम्ही या खेळाचा आनंद घेतला. – श्रद्धा कदम, पालक
पायाभूत साक्षरतेची जत्रा यामध्ये मांडण्यात आलेले सर्व खेळ आधी वर्गात घेतले जातात. विद्यार्थ्यांसाठी अशा विविध खेळांची संकल्पना राबवतो. यामध्ये चित्रासोबतच भाषाज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. – प्रणाली जोशी, शिक्षिका
विद्यार्थ्यांना शिकवत असताना फक्त पाठांतरावर भर दिला जात नाही. त्याऐवजी खेळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर दिला जातो आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रम शाळा राबवते. मुलांसाठी चित्र हीच अक्षर असतात. त्याच चित्र आणि अक्षरांचा संबंध या जत्रेच्या माध्यमातून जोडण्यात आला आहे. अशा उपक्रमाची जोड देत मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.- सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे</strong>