डोंबिवली – येथील फडके रोडवरील लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या हॅप्पी किड्स डे केअर सेंटरमध्ये लहान मुलांचा छळ होत असल्याची एक दृश्य ध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली जिल्हा संघटक कविता गावंडे यांच्या तक्रारीवरून हे केंद्र चालवणाऱ्या मालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडे पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. आपल्या मुलांची परवड होऊ नये, तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मुलांना ते पाळणाघरात ठेवतात. परंतु काही पाळणाघरात बालकांचे हाल केले जात असल्याचे या प्रकारातून उघडकीला आले आहे. पोलिसांनी सांगितले, डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले आणि त्यांची पत्नी हे दोघे नोकरदार आहेत. त्यांची तीन वर्षांची मुलगी ते डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडला लक्ष्मी सागर सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ठेवतात. हे पाळणाघर प्रभुणे दाम्पत्य चालवते. मुलीला सांभाळण्यासाठी पाळणाघराच्या चालकाला उगले दाम्पत्य दर महिन्याला साडेआठ हजार रुपये शुल्क देतात. गणेशसह त्यांची पत्नी आरती प्रभुणे, राधा नाखरे हे पाळणाघरात लहान मुलांचा सांभाळ करतात.

हेही वाचा – ..अन्यथा आम्हाला महायुतीचा धर्म तोडावा लागेल, अजित पवार गटाचा इशारा

उगले यांच्या मुलीसह अनेक लहान मुले या पाळणाघरात सांभाळण्यासाठी आहेत. प्रभुणे दाम्पत्य आणि राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते. प्रसंगी शिक्षा म्हणून उलटे टांगून त्यांना मारहाण केली जात असे. मुलांना या पाळणाघरात शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, अशा पालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

या पाळणाघरात साधना सामंत काम करण्यास रुजू झाल्या. त्यांनी बालकांना केंद्र चालकांकडून होत असलेल्या छळवणुकीचा धक्कादायक प्रकार पाहिला. सुरुवातीला त्यांनी या प्रकाराला विरोध केला. मात्र प्रभुणे दाम्पत्य काही ऐकत नव्हते. अखेर साधना सामंत यांनी हा प्रकार त्यांच्याकडील मोबाईल कॅमेरात कैद केला. ही दृश्य चित्रफित त्यांनी ठाकरे गटाच्या डोंबिवली जिल्हा संघटक कविता गावंड यांना दाखवली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कविता गावंड यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी जिल्हा संघटक गावंड यांच्यासह रामनगर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलीला देण्यात येणाऱ्या अमानुष वागणुकीची माहिती रामनगर पोलिसांना दिली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?

सुरुवातीला पोलिसांनी तुम्ही चाईल्ड वेल्फेअरमध्ये जा, असा सल्ला देऊन तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र या गंभीर घटनेची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ फिर्याद दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश आणि आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या नोकरदार महिलेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girl torture by center operators in nursery on phadke road in dombivli ssb