ठाणे : भिवंडी महापालिकेतील दोन महिला शिक्षकांनी चार व्यक्तींच्या नावाने शिक्षण विभागाचे बनावट वेतन दाखले तयार करून ठाण्यातील एका सहकारी बँकेतून लाखो रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांसदर्भाचे आदेश भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी काढले आहे. याप्रकारामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कारभारविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
भिवंडी महापालिकेच्या शाळांमध्ये उपशिक्षिका हुमा नाशिककर आणि अकीला मोमीन कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण विभागात कार्यरत नसलेल्या चार व्यक्तींच्या नावाने बनावट वेतन दाखले तयार केले. या वेतन दाखल्यावर मुख्याध्यापक म्हणून स्वाक्षरी केली. संबंधित चार व्यक्ती महापालिकेत शिक्षक असल्याचे भासवून बनावट वेतन दाखल्यांच्या आधारे त्यांनी ठाण्यातील एका सहकारी बँकेतून १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले आहे.
हेही वाचा – कल्याण-तळोजा मेट्रोने दररोज अडीच लाख प्रवाशांची वाहतूक
हेही वाचा – कल्याणमध्ये बेकायदा फलकांवर कारवाई, विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा
या प्रकाराची तक्रार भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांना मिळाली. त्यानंतर वैद्य यांनी या दोन्ही शिक्षकांचे निलंबन केले आहे. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच बनावट वेतन दाखले करून बँकेतून कर्ज कसे मंजूर झाले अशी चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे.