डोंबिवली – दिवा रेल्वे स्थानकाजवळील फाटकातून जाणाऱ्या वाहनांची संख्या रविवारी संध्याकाळी अचानक वाढली. ही वाहने दिवा पूर्व-पश्चिम भागात जात होती. दिवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक उघडल्यानंतर दोन्ही बाजुची वाहने पुढे जाण्यासाठी चढाओढ करत होती. वाढत्या वाहनांमुळे रेल्वे फाटक रस्ता वाहनांनी गजबजून गेला. ही वाहने रेल्वे फाटकातून जाईपर्यंत २० ते २५ मिनिटांचा कालावधी गेला. फाटक बंद न झाल्याने या कालावधीत दिवा, मुंब्रा, कोपर भागात लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबून राहिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवार सुट्टीच्या दिवशी विविध कार्यक्रम, लग्नासाठी बाहेर पडलेले नागरिक या खोळंब्यामध्ये दिवा रेल्वे स्थानकात अडकून पडले. २० ते २५ मिनिटे दिवा रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कल्याण दिशेने आणि कल्याणकडून मुंबई दिशेने एकही लोकल न आल्याने दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली. त्यात रविवारी लग्नाचा मुहूर्त होता. त्यामुळे अनेक कुटुंबीय आपल्या लहान मुलांबाळासह, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह घराबाहेर पडले होते. त्यांना या खोळंब्याचा सर्वाधिक फटका बसला.

दिवा पूर्व भागातून पश्चिमेत रेल्वे फाटकातून जाणाऱ्या, पश्चिमेतून पूर्व भागात येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक होती. फाटक बंद असताना या फाटकाच्या दोन्ही बाजुला वाहनांचा रांगा लागल्या होत्या. एकदा फाटक उघडल्यावर दोन्ही बाजुने कोंडीलेली वाहने एकदम रेल्वे फाटकातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे फाटकात काही वेळ कोंडी झाली. ही वाहने फाटकातून जाण्याची बंद होत नाहीत, तोपर्यंत रेल्वे फाटक कर्मचाऱ्याला फाटक बंद करता येत नव्हते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचीही मोठी अडचण झाली.

या कालावधीत दिवा रेल्वे स्थानकाकडून दोन्ही बाजुने येणाऱ्या लोकल, एक्सप्रेस मुंब्रा, दिवा, कोपर रेल्वे स्थानक भागात खोळंबल्या. रेल्वे फाटकातील वाहनांची येजा थांबल्यावर फाटक आडवे पडल्यावर, मग दिवा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुने खोळंबलेल्या लोकल, एक्सप्रेस पाठोपाठ सुरू झाल्या.

मध्य रेल्वे मार्गावरील सुमारे ५० हून अधिक रेल्वे फाटके रेल्वे प्रशासनाने बंद केली. दिवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा. दिवा शहराची वस्ती वाढल्याने या भागातील वाहन संख्या वाढली आहे. रेल्वे फाटक बंद करण्यासाठी आवश्यक असलेला उड्डाण पूल येथे उभारण्यात आला आहे. परंतु, भूसंपादनाच्या अडचणीमुळे पुलाचे काही काम खोळंबले असल्याचे समजते. हे काम पूर्ण होत नसल्यामुळे रेल्वेला फाटक बंद करणे शक्य होत नसल्याचे रेल्वेतील एका माहितगाराने सांगितले.