राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असली तरी सरकारमध्ये शिवसेना हा पक्ष दुय्यम स्थानी आहे, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुरुवारी शिवसेनेला मिळालेले यश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ठाणे जिल्हय़ातील अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळविले, तर नवी मुंबई महपालिकेत जरी सत्ता मिळविण्यास अपयश आले तरी तेथील ‘सत्ताधीश’ गणेश नाईक यांना शिवसेनेनी चांगलीच टक्कर दिली. बदलापूरमध्ये स्थानिक भाजप नेते किसन कथोरे यांनाही धोबीपछाड देण्यास यश आले.
अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळत असताना नवी मुंबईत भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याच्या नादात अचूक रणनीती आखण्यात अपयशी ठरलेले ठाणे जिल्हय़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी गुरुवारी जाहीर झालेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक निकाल म्हणजे ‘कही खुशी कही गम’ असेच ठरले. जिल्हय़ातील दोन नगरपालिका आणि एका महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीसाठी शिवसेनेची संपूर्ण धुरा सुरुवातीपासून पालकमंत्री शिंदे यांच्या खांद्यावर होती. गणेश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर नवी मुंबईत शिवसेना कधीही २० नगरसेवकांचा आकडा ओलांडू शकली नव्हती. त्यामुळे ३६ नगरसेवकांचा आकडा शिंदे यांच्यासाठी काहीसा दिलासादायक ठरला असला तरी भाजपशी स्थानिक पातळीवर केलेले युतीचे डावपेच सपशेल चुकल्याचे दिसून आले. दुसरीकडे बदलापुरात भाजपचे स्थानिक नेते किसन कथोरे यांना धोबीपछाड देताना शिवसेनेने अंबरनाथ नगरपालिकेतील सत्ता राखण्यात यश मिळविल्याने शिंदे यांना या दोन नगरपालिकांतील निकालांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्हय़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीचा केंद्रिबदू हे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे ठरले. नवी मुंबईत गणेश नाईक, बदलापुरात किसन कथोरे आणि अंबरनाथ येथे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली असली तरी या तीनही ठिकाणी पालकमंत्री म्हणून शिवसेनेच्या बाजूने शिंदे यांचा मुक्त वावर होता. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा अविभाज्य भाग असलेल्या अंबरनाथ परिसरात सत्ता राखणे हे शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे होते. या भागाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून या भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांचा धडाका लावत वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न चालविला होता. विधानसभा निवडणुकीनंतर येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था फारच बिकट झाली असली तरी भाजपला मिळालेली मते शिवसेना नेत्यांनाही तोंडात बोटे घालणारी ठरली होती. त्यामुळे काहीही झाले तरी अंबरनाथमध्ये एकहाती भगवा फडविण्याचे आव्हान सेनेच्या नेत्यांपुढे होते. बदलापुरात किसन कथोरे भाजपच्या तिकिटावर निवडून आल्याने तेथील स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला उघडपणे आव्हान देण्यास सुरुवात केली होती. बदलापूर हा पहिल्यापासून भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे शिवसेनेसोबत युती करायची नाही, या मताशी येथील भाजपचे नेते ठाम होते. अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती नको, अशी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका होती. या दोन्ही ठिकाणी भाजपला अंगावर घेण्याची रणनीती एकनाथ िशदे यांनी आखली आणि गुरुवारी जाहीर झालेले निकाल पाहाता त्यांनी ती बऱ्याच अंशी यशस्वी करून दाखविल्याचे चित्र स्पष्टपणे पुढे आले आहे. बदलापुरात आमदार कुणीही असला तरी सत्ता आपल्याच हाती ठेवण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून या दोन्ही ठिकाणी विजयाचे शिल्पकार होण्याचा मान िशदे यांना मिळाला असला तरी नवी मुंबईतील पराभवामुळे मात्र त्यांच्या या विजयाला गालबोट लागले आहे. नवी मुंबईत जागावाटपात िशदे यांनी कचखाऊ धोरण अवलंबिल्याने भाजपला तब्बल ४३ जागा सोडण्याचा आत्मघातकी निर्णय शिवसेना नेतृत्वाने घेतला. कोणत्याही परिस्थितीत भाजपशी जुळवून घ्यायचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याच्या फंद्यात नको तेवढय़ा जागा भाजपला देऊन शिवसेनेने मोठय़ा प्रमाणावर स्वकीयांची नाराजी ओढवून घेतली. त्याचा फटका स्पष्टपणे या निवडणुकीत शिवसेनेला बसल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे अंबरनाथ-बदलापुरातील विजयाचे शिल्पकार ठरलेल्या पालकमंत्र्यांच्या यशावर नवी मुंबईतील पराभवाने एका अर्थाने विरजण फिरवल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.
जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local body election result brought satisfaction for eknath shinde