डोंबिवली – रविवारी संध्याकाळी दिवा रेल्वे फाटकातून वाहने पूर्व-पश्चिम दिशेला विहित वेळेत बाहेर न पडल्याने कल्याणकडून सीएसएमटी आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे येणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस जागोजागी खोळंबल्या. भाऊबिजेसाठी बाहेर पडलेले नागरिकांना लोकल रखडल्याचा सर्वाधिक फटका बसला. रेल्वे फाटकातील वाहने बाजुला होत नाहीत तोपर्यंत मोटरमनला लोकल पुढे जात नसल्याने डोंबिवली, कोपर, मुंब्रा, कळवा, ठाणे दिशेला लोकल, लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसच्या रांगा लागल्या होत्या, असे रेल्वे सुरक्षा जवानाने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी असल्याने दिवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर फेरीवाले रस्ता अडवून व्यवसाय करत आहेत. या भागातील रस्ता अरूंद, त्यात भाऊबिजेसाठी नागरिक आपली खासगी दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन बाहेर पडले आहेत. दिवा शहरासह आजुबाजुच्या परिसरातील वाहने दिवा पूर्व रेल्वे स्थानकातील रस्त्यांवर आल्यावर फेरीवाले, मासळी विक्रेत्यांनी रस्ता अडवून ठेवला होता. सर्व वाहने दिवा पूर्व रेल्वे स्थानक भागात अडकून पडली.

हेही वाचा…Ambernath Assembly Constituency : अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांच्या अडचणीत वाढ

शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास नको म्हणून डोंबिवलीकडून ठाणे दिशेने जाणारा प्रवासी रुणवाल संकुल भागातून आगासन मार्गे दिवा येथून प्रवास करत होता. शिळफाटा दत्तमंदिर कल्याण फाटा येथील कोंडीत अडकायला नको म्हणून ठाणे, मुंबई, नवी मुंबईतून डोंबिवली, कल्याणकडे येणारा प्रवासी शीळ गावातून दिवा, आगासनमार्गे प्रवास करत होता. ही सर्व वाहने दिवा पूर्व रेल्वे स्थानक भागातील अरूंद रस्त्यांवर दोन्ही बाजूने अडकून पडली. या कोंडीमुळे दिवा गावातील अंतर्गत रस्ते वाहन कोंडीत अडकले.

रेल्वे फाटक कोंडीत

दिवा पूर्व रेल्वे स्थानक परिसर संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोंडीत अडकला होता. त्याचवेळी दिवा पूर्व भागातून पश्चिमेत जाण्यासाठी काही वाहने सज्ज होती. दिवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक उघडताच पूर्व, पश्चिम भागातील वाहने रेल्वे स्थानकातून धावू लागली. दिवा पूर्व भागातील रस्त्यावर जाण्यास मोकळी जागा नसल्याने रेल्वे फाटकातून बाहेर पडणारी वाहने रेल्वे फाटकात मधोमध अडकली. ही वाहने पुुढे जात नाहीत तोपर्यंत मोटरमनला लोकल सीएसएमटीकडे नेता येत नव्हती. संध्याकाळी साडे पाच ते संध्याकाळी ६.१० वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. ६.१० वाजता रेल्वे फाटकातील दोन्ही बाजुची वाहने बाहेर पडल्यानंतर रेल्वे मार्ग मोकळा झाला. त्यानंतर दिवाकडून सीएसएमटीकडे लोकल धावू लागल्या. तोपर्यंत ठाणे, डोंंबिवली दिशेने लोकल, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे फाटकातील कोंडीमुळे लोकलचे वेळापत्रक नंतर कोलमडले. सणाच्या दिवशी लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते.

हेही वाचा…ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा

शिळफाटा रस्ता कोंडीत

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. वीस मिनिटांच्या प्रवासाला एक ते दीड तास लागत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. भाऊबिजेनिमित्त नागरिक अधिक संख्येने आपली खासगी वाहने घेऊन बाहेर पडली आहेत. ही सर्व वाहने शिळफाटा रस्त्यावर अडकून पडली आहेत. कोळसेवाडी वाहतूक पोलीस जागोजागी कोंडी सोडविण्याचे प्रयत्न करत आहेत. वाहनांची संख्या अधिक असल्याने त्यांची दमछाक होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local express train got disrupted due to traffic jam at diva railway crossing gate zws