ठाणे : ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून मानपाडा येथील मुल्लाबाग येथे प्रस्तावित कचरा हस्तांतरण केंद्र तयार करण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध केला. महापालिका उपायुक्त मनीष जोशी हे पथकासह कचरा हस्तांतरण केंद्राच्या जागेवर गेले असता, नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे महापालिका पथक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग झाले. त्यामुळे आता ठाण्यात कचरा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण होत आहे.

वागळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र होते. या केंद्रावर मोठ्याप्रमाणात कचरा साचू लागला होता. त्यामुळे कचरा हस्तांतरण केंद्राची अवस्था कचराभूमी प्रमाणे झाली होती. मागील अनेक महिन्यांपासून हा कचरा हस्तांतरण प्रकल्प हटविण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात होती. नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर तसेच शिंदे गटाने महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाणे महापालिकेने येथून कचरा हस्तांतरण बंद केले. परंतु आता रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मुल्लाबाग परिसरात महापालिकेचे पथक प्रायोगिक स्तरावर कचरा हस्तांरण केंद्र तयार करण्यासाठी गेले होते. मुल्लाबाग परिसरात मोठ्याप्रमाणात रहिवाशी क्षेत्र आहे. महापालिकेचे पथक आल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाल्यानंतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि रहिवासी त्याठिकाणी गेले. त्यांनी पथकाला विरोध करण्यास सुरुवात केली. येथे दगडफेक झाल्याचा आरोप देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका व्यक्तीने जेसीबीच्या समोर झोपण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रचंड विरोधानंतर महापालिकेचे पथक तेथून निघून गेले.

रोगराईला आमंत्रण, स्थानिकांचा आरोप

– येथे रहिवासी क्षेत्र आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान बालके प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. कचरा हस्तांतरण केंद्र झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांची कोणतीही बैठक घेतली नसल्याचा दावा स्थानिकांनी केला.

महापालिकेचे काय म्हणणे आहे?

– येथे आम्ही फक्त कचरा हस्तांतरण केंद्र करणार होतो. याच परिसरातील नागरिकांच्या कचऱ्यासाठी हस्तांतरण केंद्र प्रस्तावित केला होता. त्याला मोठ्याप्रमाणात विरोध करुन बंद पाडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक चार या भागाचाच कचरा येथे येणार होता, हा विरोध योग्य नाही. ठाणे शहरातील प्रत्येक प्रभाग समितीने त्यांच्या कचऱ्याची जबाबदारी स्विकारली आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची जागा आहे. त्यांचाच कचरा जर त्यांच्या भागात येणार नसेल तर मग त्यांचा कचरा जाणार कुठे हा प्रश्न देखील नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.

नागरिकांकडून विरोध होत असले. तरी प्रभागसमीती निहाय हस्तांतरण केंद्र सुरू करणार आहोत – मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महपालिका.