बदलापूर – मध्य रेल्वे प्रशासन मुंबई ते बदलापूर दरम्यान रद्द झालेल्या वातानुकूलित लोकल पुन्हा सुरू करण्यास इच्छुक आहे. याबाबत प्रवाशांना कोणतीही हरकत किंवा सूचना असल्यास त्यांनी स्थानक व्यस्थापक कार्यालयाशी २० सप्टेंबर पर्यंत संपर्क साधावा. असा सूचना फलक बदलापूर रेल्वे स्थानकात लावण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर रेल्वे प्रशासनाने साध्या लोकल रद्द करून पून्हा त्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय घेतला तर त्याला तिव्र विरोध करणार असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बदलापुरात वातानुकूलित लोकलवरून पुन्हा वादंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखरेसी मध्य रेल्वे प्रशासनाकडून संध्याकाळच्या वेळेतील मुंबईहून बदलापूर करिता सुटणाऱ्या सध्या लोकलच्या ऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्यात आली होती. लोकल अचानक रद्द केल्याने प्रवाशांना त्याऐवजी खोपोली लोकलने प्रवास करावा लागला होता. त्यामुळे प्रवाशांना मोठया गर्दीचा सामना करावा लागला होता. यामुळे संतप्त प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सतत तीन दिवस रेल्वे प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. प्रवाशांचा तीव्र विरोध पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने पुन्हा वातानुकूलित लोकल रद्द करून त्याऐवजी साधी लोकल चालविण्याचा निर्णय घेतला होता. या गोष्टीला दोन आठवडे उलटत नाहीत तोच रेल्वे प्रशासनाने मुंबई ते बदलापूर स्थानकादरम्यान रद्द करण्यात आलेली वातानुकूलित लोकल पुन्हा सुरु करण्याबाबत तयारी केली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात एक सूचना फलक लावला आहे. ज्यामध्ये रेल्वे प्रशासनाची पुन्हा वातानुकूलित लोकल सुरु करण्याची इच्छा असून प्रवाशांनी याबाबत २० सप्टेंबर पर्यंत आपल्या लेखी सूचना स्थानक व्यवस्थापक कार्यलयात सादर कराव्यात असे नमूद करण्यात आले आहे. साध्या लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल चालवू नये. साध्या लोकलला वातानुकूलित डब्बे जोडावे अशा सूचना काही प्रवाशांनी केल्या आहेत. तर याबाबत काही प्रवाशांकडून नाराजीचा सुरु उमटत आहे. यामुळे प्रवाशांच्या सूचनांना बगल देऊन प्रशासनाने पुन्हा एकदा वातानुकूलित लोकल सुरु केल्यास बदलापुर स्थानकात वातानुकूलित लोकलवरून पुन्हा वादंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा : विश्लेषण : ठाणे जिल्ह्यातील डम्पिंग ग्राउंड समस्या का बनली आहे उग्र?
वातानुकूलित लोकल बाबत प्रवाशांच्या सूचना जाणून घेण्यासाठी तसेच रेल्वे प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी बुधवार १४ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनातर्फे बदलापूर येथे प्रवासी संघटना, पोलीस प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर प्रवाशांच्या वातानुकूलित लोकल बाबत सूचना जाणून घेण्यासाठी स्थानकात सूचना फलक लावण्यात आला आहे. येत्या २० तारखेपर्यंत प्रवाशांच्या या सूचना जाणून घेऊन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत अहवाल देण्यात येणार असल्याचे बदलापूर रेल्वे स्थानक व्यवस्थापक कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.
वातानुकूलित लोकलचे दर कमी करावे. वातानुकुलीत लोकलला आमचा विरोध नसून साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविण्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी पुन्हा एकदा वातानुकूलित लोकल चालविली तर त्याला प्रवासी संघटनेतर्फे तीव्र विरोध केला जाईल.
– रमेश महाजन, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संघ, बदलापूर