६२ तासांचा मेगाब्लाॅक घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरण करण्यात आले. कमी कालावधीत केलेल्या या कामांचा सर्वस्तरातून गौरव झाला. आता पाऊस पडल्यावर या रुंदीकरण केलेल्या फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे साचते. या तळ्यातून लोकलमध्ये चढताना विशेषता महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर केलेल्या रूंदीकरणाचे काम सिमेंट काँक्रीटचे आहे. हे काम मजबूत होण्यासाठी त्याच्यावर घायपताच्या गोण्या टाकण्यात आल्या आहेत. या गोण्यांवर सकाळ, संध्याकाळ ठेकेदार पाणी मारतो. त्यामुळे सिमेंटमधील ओलावा कायम राहून हे काम मजबूत होईल. परंतु, या गोण्या ओल्या असल्यामुळे फलाटावर लोकल आली की या ओल्या गोण्या प्रवाशांच्या पायात अडकतात, अनेक प्रवाशांच्या चपला या गोण्यांमध्ये अडकत असल्याने ते पाय घसरून फलाटावर पडत आहेत.

हेही वाचा… कल्याण पूर्वेत काटेमानिवलीत दोन गटांच्या राड्यात घरे आणि वाहनांची तोडफोड

गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पाऊस पडला. यावेळी रुंदीकरण केलेल्या फलाटावर छप्पर नसल्याने आणि पावसाचे पाणी थेट फलाटावर पडल्याने या फलाटावर पाण्याचे तळे साचले होते. बहुतांशी प्रवाशांंचे बूट चामड्याचे असतात. त्यांना या पाण्यातून जाताना काळजी घ्यावी लागत होती. फलाटावरील साचलेले पाणी बाहेर जाण्यासाठी वाट नसल्याने ते फलाटावर तुंबून होते. लोकल आली की प्रवासी या पाण्यातून उड्या मारत जात असल्याने आजुबाजुच्या प्रवाशांच्या कपड्यांवर हे पाणी उडत आहे. अनेक प्रवासी या पाण्यात पाय घसरून पडत होते. या नवीन कामाचा हा नवीन ताप पाहून प्रवासी संंतप्त होत होते.

त्यामुळे फलाट क्रमांक पाचवर मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी छप्पर बसविण्याचे आणि फलाटावर पावसामुळे तुंबणारे पाणी वाहून जाईल यासाठी व्यवस्था करावी,अशी मागणी प्रवासी करत आहेत.

हेही वाचा… डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या शुभेच्छा फलकांनी कल्याण, डोंबिवली शहरांचे विद्रुपीकरण; प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना फलक न काढण्यासाठी दमदाटी

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक पाच, सहा रूंदीकरणाचे काम रेल्वेने गतीने केले. या कामामुळे या फलाटावर होणाऱ्या गर्दीचे विभाजन झाले आहे. या रूंदीकरण केलेल्या फलाटावर छप्पर नाही. त्यामुळे पावसाचे पाणी थेट फलाटावर पडून तळे साचत आहे. तसेच या ठिकाणी काँक्रिट मजबुतसाठी गोणपाटे टाकली आहेत. ती प्रवाशांच्या पायात अडकत आहेत. – रोहिणी जपे, प्रवासी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train passenger facing problems at platform no five and six at thane railway station due to rain asj