ठाणे : ऐरोली आणि रबाळे रेल्वे स्थानका दरम्यान एका रेल्वे प्रवाशावर दगड भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत प्रवाशाच्या उजव्या डोळ्याखाली दुखापत झाली. प्रवाशाने तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण येथील लोकग्राम परिसरात जखमी झालेले ३५ वर्षीय प्रवासी राहतात. ते नवी मुंबई येथील घणसोली परिसरातील एका काॅल सेंटरमध्ये काम करतात.
ते दररोज घणसोली रेल्वे स्थानकातून ठाणे रेल्वे स्थानक गाठतात. त्यानंतर ठाण्याहून ते कल्याणला येत असतात. १२ एप्रिलला रात्री ते कामावरुन सुटले होते. त्यामुळे ते घणसोली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वर आले होते. रात्री ८.२० मिनीटांनी त्यांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडीत प्रवेश केला. ते रेल्वेगाडीच्या दरवाजाजवळ उभे होते. रात्री ८.३० वाजता रेल्वेगाडी रबाळे स्थानकातून पुढे रवाना झाली असताच, बाहेरून एक दगड त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आला.
हा दगड त्यांच्या उजव्या डोळ्याखाली लागला. त्यामुळे त्यांच्या डोळ्याखाली रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहचले. प्रवाशाला प्रथमोपचार करण्यात आले. घरी पोहचल्यानंतर प्रवाशाला त्रास होऊ लागल्याने त्याने याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, १२५ (अ) आणि भारतीय रेल्वे अधिनियम १९८९ चे कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वीही अनेक घटना
रेल्वे प्रवासा दरम्यान अशा अनेक घटना प्रवाशांसोबत घडत असतात. पूर्वी मध्य रेल्वे मार्गावर फटका गँगच्या टोळ्या सक्रीय होत्या. या टोळ्या रेल्वेच्या सिग्नल खांबावर उभे राहतात. रेल्वेगाड्यात दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातात मोबाईल असल्यास ही फटका गँग प्रवाशाच्या हातावर फटका मारत. प्रवाशाच्या हातातील मोबाईल त्यामुळे खाली पडत असे. त्यानंतर ही फटका गँग मोबाईल घेऊन पळून जात असे. या घटनांमध्ये प्रवाशाला गंभीर दुखापत होत होती.
तसेच अनेकदा रेल्वेगाड्यांमध्ये दारात उभे राहून प्रवाशांच्या दिशेने दगड भिरकावण्याचे देखील प्रकार समोर आले होते. या प्रकारांत प्रवाशांच्या डोक्याला किंवा शरिरावर दगड लागल्याने प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. रात्रीच्या अंधारात असे प्रकार घडत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.