बदलापूर : फलाटावर स्वयंचलित जीने बसवणे आणि उदवाहन बसवण्याच्या कामासाठी बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक बंद करण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे लोखंडी जाळी बसवली आहे. त्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी रेल्वे प्रवाशांची कसरत झाली.

होम फलाटावरून सुटणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी आधी प्रवाशांना येथे सोयीचे होते. मात्र सोमवारी नव्या फलाट क्रमांक एकवरून गाडी पकडताना मोठी गर्दी झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून येथे पोलिसही तैनात करण्यात आले होते. मात्र या प्रकारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बदलापूर रेल्वे स्थानकात विविध कामे सुरू आहेत. एकीकडे तिसऱ्या चौथ्या मार्गिकेसाठी काम सुरू असून दुसरीकडे बदलापूर स्थानकात डेक बनवणे, स्थानकात विविध सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी येथे गर्दी विभाजनासाठी होम फलाटाची उभारणी करण्यात आली होती. तो गेल्याच वर्षात निम्मा पूर्ण झाला. त्यामुळे फलाट क्रमांक एक आणि दोनवर असलेली गर्दी विभागली जाऊ लागली. तसेच होम फलाटावरून अर्धी गर्दी विभागल्याने पादचारी पुलावरचीही गर्दी कमी झाली होती.

मात्र फलाट क्रमांक दोनवर स्वयंचलित जीने आणि उदवाहन उभारणीसाठी रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजवणी शनिवारी रात्री करण्यात आली. त्यानंतर सोमवारी पहिल्यांदा प्रवाशांना या कामाचा फटका बसला. एरवी मुंबईकडे जाणाऱ्या आणि होम फलाटावरून सुटणाऱ्या गाड्यांची गर्दी विभागली जात होती. मात्र सोमवारी नव्या फलाट क्रमांक एकवर मोठी गर्दी झाली. त्यामुळे लोकल गाडीत चढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली. फलाट क्रमांक दोन मात्र रिकामा होत आणि दुसरीकडे नव्या फलाट क्रमांक एकवर प्रवाशांनी फलाट भरले होते.

प्रवाशांसाठीच सुविधा

फलाट क्रमांक एकला जाळी लावून बंद केल्यानंतर प्रवाशांनी सोमवारी रेल्वे प्रशासनाविरूद्ध संताप व्यक्त केला. मात्र फलाट क्रमांक दोन वर उदवाहन आणि स्वयंचलित जीने बसवण्यासाठी या फलाटावर जाळी लावली आहे. सध्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी या गोष्टी कराव्या लागणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी दिली आहे.

प्रवाशांनी या तात्पुरत्या अडचणींसाठी सहकार्य करावे. यातील सुविधा दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. प्रवाशांनी अतिरिक्त सूचना केल्यास त्यांना सुविधाही देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.