ठाणे : कळवा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी दुपारी जलद मार्गिकेवर ओव्हरहेड तार तुटल्याने १५ ते २० मिनीटे उशीराने उपनगरीय रेल्वे वाहतुक सुरू होती. तसेच जलद मार्गिकेवरील लोकल वाहतुक धिम्या मार्गिकेवरून वळविण्याबरोबरच १० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास दुरूस्तीचे काम पूर्ण करून रेल्वे वाहतुक पूर्ववत केली. कळवा स्थानकाजवळ बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास जलद मार्गिकेवरील ओव्हरहेड तार तुटली. येथील बिघाड दुरूस्त करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जलद रेल्वे गाड्यांची वाहतुक धिम्या मार्गिकेवरून सुरू केली.
हेही वाचा >>> शिंदे गटाने शाखा जमीनदोस्त केल्यानंतर उद्धव ठाकरे मुंब्रा शहरात
सकाळ आणि सायंकाळ यावेळेत रेल्वेने नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करतो. दुपारी प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असते. दुपारच्या वेळेत ओव्हरहेड तार तुटल्याने स्थानकात फारसा परिणाम जाणवला नाही. असे असले तरी दुपारी रेल्वेने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना १५ ते २० मिनीटे लोकलची वाट पाहावी लागत होती. रेल्वे प्रशासनाने कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या १० रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा भार इतर रेल्वेगाड्यांवर आला होता. सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास येथील दुरुस्तीचे काम पूर्ण करून जलद मार्गावरील रेल्वेगाड्यांची वाहतुक पूर्ववत करण्यात आली. परंतु या बिघाडामुळे वेळापत्रक कोलमडल्याने दुरूस्ती कामानंतरही १० ते १५ मिनीटे उशीराने रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरू होती. त्यामुळे सायंकाळी कामाहून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले.