प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने वेगवेगळय़ा सुविधा आणि उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरी वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत उपनगरी रेल्वेगाडय़ांची संख्या कमी असल्याने होणाऱ्या गर्दीमुळे लोकलमधून पडून किंवा गाडी पकडण्याच्या नादात जीव गमवावा लागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कल्याणपलीकडील रेल्वेमार्गावर तर अशा अपघातांचे प्रमाण वाढतच असून गेल्या पाच वर्षांत तब्बल दोन हजार २९३ जणांचा या मार्गावरील प्रवासात मृत्यू झाला आणि २२११ जण जखमी झाले. विशेष म्हणजे, वेळेत उपचार न मिळाल्याने दगावणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचेही यातून उघड होत आहे.
कल्याण रेल्वे पोलिसांच्या अंतर्गत कल्याण ते कसारा आणि बदलापूपर्यंतच्या स्थानकांचा समावेश आहे. या १४ स्थानकांमधून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. वाढते नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. परंतु त्या तुलनेत लोकलगाडय़ा अपुऱ्या असल्याने मिळेल त्या गाडीतून आणि जमेल त्या पद्धतीने प्रवास करावा लागतो. यामुळे गाडीतून खाली पडून मरण पावणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. गेल्या पाच महिन्यांतच या मार्गावरील रेल्वे अपघातांत १९६ जणांचा मृत्यू झाला तर १९१ जण जखमी झाल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते.
रेल्वे अपघातांतील जखमींना त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. अनेक स्थानकांत रुग्णवाहिकेची व्यवस्था नाही. बरेच वेळा जखमींना खासगी वाहन किंवा रिक्षाने रुग्णालयात न्यावे लागते. यात गंभीर जखमींची परवड होते. त्या व्यक्तींवर योग्य उपचारासाठी प्रसंगी मुंबईला न्यावे लागते. यात जो वेळ जातो, त्यामुळे त्या व्यक्तीचा प्राण जातो, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
अपघातांचा रेल्वेमार्ग
कल्याण-कसारा आणि बदलापूर स्थानकांदरम्यानच्या अपघातांची आकडेवारी
वर्ष मृत्यू जखमी
२०१० ४१५ ३९३
२०११ ३९२ ४०५
२०१२ ४३६ ४१४
२०१३ ४२० ३९७
२०१४ ४३४ ४११
२०१५ १९६ १९१
(२०१५ची आकडेवारी मे महिन्यापर्यंतची आहे)
समीर पारखी, कल्याण</strong>