कल्याण – मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत-कसाराकडून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल दररोज २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील रेल्वे मुख्यालयात जाऊन याविषयीची लेखी तक्रार केली.
मागील काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सकाळच्या वेळेत २० ते ३० मिनिटे उशिराने धावतात. पेन्टोग्राफ तुटलेला नाही. रेल्वे रूळ सुस्थितीत आहेत. दर्शक यंत्रणा सुस्थितीत असताना लोकल उशिरा का धावतात, असे प्रश्न नोकरदार प्रवाशांकडून समाज माध्यमाच्या माध्यमातून रेल्वे अधिकाऱ्यांना केले जातात. परंतु, त्यांना उत्तरे दिली जात नाहीत.
दाट धुके असले की लोकल उशिरा धावतात. अलीकडे नियमित धुके नसते. धुके असले की ठाण्यापर्यंत लोकल हूळ धावतात. पुढे धुक्याचे प्रमाण कमी असल्याने लोकल वेगाने धावतात. त्यामुळे धुक्यामुळे लोकल कधीतरी उशिरा धावतात. हे माहिती असल्याने मग नियमित लोकल उशिरा धावण्याचे कारण काय, या विषयी रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची मागणी अनेक प्रवाशांनी विशेषता महिला प्रवाशांनी उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांच्याकडे केली होती.
मध्य रेल्वेच्या लोकल गेल्या काही दिवसांपासून उशिराने धावत आहेत. कधीतरी धुके असते त्यावेळी प्रवासी लोकल उशिरा धावत आहेत हे गृहित धरतात. आता कोणतेही तांत्रिक बिघाड नसताना लोकल उशिराने का धावत आहेत. याचे उत्तरे रेल्वे प्रशासनाने द्यावे आणि वेळेत लोकल धावतील याकडे लक्ष द्यावे.
-लता अरगडे (अध्यक्षा, उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघ)
अरगडे यांनी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना मोबाईलवरून यासंदर्भात विचारणा केली परंतु, त्यांना अपेक्षित उत्तरे देण्यात आली नाहीत. नियमितच्या उशिरा लोकलने कार्यालयात नोकरदार वर्गाला उशिरा जावे लागते. कार्यालयात नियमित उशिराची उपस्थिती अलीकडे ग्राह्य धरील जात नाही. त्यामुळे काही नोकरदारांना विशेषता खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन खाड्याला सामोरे जावे लागते. पश्चिम रेल्वेच्या लोकल वेळेप्रमाणे धावत असतात. मग मध्य रेल्वेच्या लोकल उशिरा का धावतात असा प्रश्न करून अरगडे यांनी बुधवारी रेल्वे मुख्यालयातील तक्रार नोंदीत याविषयीची तक्रार नोंद करून त्याची दखल घेण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली.