ठाण्यात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर तोडगा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसायला जागा मिळावी यासाठी ठाणे स्थानकातून सुटणारी लोकल पकडण्याकरिता कळवा, मुंब्रा या नजीकच्या स्थानकांतून येणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी कळवा स्थानकातून लोकल सोडण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या स्थानिक प्रशासनाने नियोजन यंत्रणेकडे पाठवला आहे.

कळवा रेल्वे स्थानकात ऐरोली-कळवा उन्नत नियोजित रेल्वे मार्ग आणि नव्या मार्गिकांचे कामाचे नियोजन सध्या वेगाने सुरू आहे. यापैकी नव्या मार्गिकांचे काम सुरू करण्यात आले असून ऐरोली-कळवा उन्नत मार्गाची आखणी अंतिम टप्प्यात आहे. हे काम करत असताना कळवा लोकलसाठी अधिकचा मार्ग टाकता येऊ शकतो, असा प्रस्ताव कळव्यातील रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला सुचविला आहे. ठाण्याच्या पुढील मार्गावर कल्याण दिशेकडे ठाण्याव्यतिरिक्त डोंबिवली आणि कल्याण अशा दोन स्थानकांमधून लोकल गाडय़ा सुरू होतात. कल्याण आणि डोंबिवली या स्थानकात उसळणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे कळवा, मुंब्रा स्थानकातील प्रवाशांना या गाडय़ांचा फारसा उपयोग होत नाही. सकाळी गर्दीच्या वेळेत डोंबिवली स्थानकातून प्रवाशांनी तुडुंब भरणाऱ्या गाडय़ांमध्ये मुंब्रा, कळवा स्थानकातील प्रवाशांना चढणे देखील कठीण होते.

ठाणे स्थानकातून सुरू होणाऱ्या लोकल गाडय़ांमधून प्रवास करण्यासाठी विटावा, भोलानगर यांसारख्या भागातून अनेक प्रवासी रुळावरून चालत ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात. या प्रकारामुळे ठाणे स्थानकातील रेल्वे रुळावर प्रवाशांच्या होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कळवा स्थानकातून अधिक मार्गिका टाकून गाडय़ा सोडण्याची सोय करणे सहज शक्य होऊ शकते, असे कळवा स्थानकातील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  यासंबंधी सविस्तर प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

प्रस्ताव काय?

  • ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल कळवा कारशेडमधूनच आलेल्या असतात. कळवा फाटकाजवळ या लोकल थांबतात तेव्हा प्रवासी त्यात चढण्याचा प्रयत्न करतात.
  • या पाश्र्वभूमीवर कळवा स्थानकातूनच लोकल सोडल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल, असे स्थानिक रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
  • यासाठी सद्य:स्थितीत असलेल्या मार्गिकेत भर टाकावी लागणार असून हे तांत्रिकदृष्टय़ा शक्य असल्याचा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे.

ठाणे स्थानकातील अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांना अनेकदा गाडय़ांमध्ये चढणे देखील शक्य होत नाही. कळवा स्थानकातून गाडय़ा सुरू केल्यास येथील प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.

नंदकुमार देशमुख, रेल्वे प्रवासी संघटना

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local will start from kalwa than passengers load