ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून मेट्रोची कामे आणि सेवा रस्त्यांवरील वाहने, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखेने येथील ब्रम्हांड चौक आणि तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील चौक दुभाजक बसवून बंद केला आहे. याप्रकारामुळे घोडबंदरहून ब्रम्हांड, आझादनगर, कोलशेतच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना, टीएमटी बसगाड्यांना पातलीपाडा उड्डाणपूलाखालून वळसा घालावा लागत आहे. तर तत्त्वज्ञान विद्यापीठ येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना वसंत विहारचा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे ब्रम्हांड, आझादनगर, कोलशेत, तत्त्वज्ञान विद्यापीठ भागात राहणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >>> उल्हासनगरात पालिका उभारणार संक्रमण शिबीर; १२ इमारतीत २७० सदनिकांचा प्रस्ताव, २० कोटींचा खर्च
गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गावरून होत असते. भिवंडीहून गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने याच मार्गावरून वाहतूक करतात. परंतु गेल्याकाही वर्षांपासून वडाळा- घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम घोडबंदर मार्गावर सुरू आहे. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठिकठिकाणी मेट्रोचे अडथळे उभे केले आहेत. तसेच सेवा रस्त्याच्या भागातही खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे ही मार्गिका अरुंद झालेली आहे. तर ठाण्याच्या दिशेकडील मार्गिकेवर सेवा रस्त्यांवर अनेक वाहने उभी केली जात असता. काही फेरीवाल्यांचाही विळखा या सेवा रस्त्यावर असतो. त्यामुळे वाहतूकीवरही त्याचा परिणाम होत असतो. गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या स्थानक निर्माणाचे काम तसेच अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नुकतीच महापालिका आणि वाहतूक पोलिसांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये ब्रम्हांड चौक आणि तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील चौकातील वळण रस्ता दुभाजक उभे करून बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून हा चौक बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> कल्याणमधील उंबर्डे येथील कचराभूमीवरील सुरक्षारक्षकांना गुंडांची मारहाण
ब्रम्हांड, कोलशेत भागात मोठी गृहसंकुले आहेत. तर आझादनगर भागातही लोकवस्ती वाढली आहे. लाखो नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. वळण रस्ता बंद केल्याने येथील नागरिकांनी पातलीपाडा उड्डाणपूलाखालून वळसा घालत ब्रम्हांडच्या दिशेने जावे लागत आहे. त्यामुळे इंधन आणि अतिरिक्त वेळही वाया जात असल्याची टिका येथील नागरिक करत आहेत. तर, तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील चौकातही अडथळे उभारण्यात आले आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसर, हिरानंदानी मिडोज या भागातून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांना वसंत विहार भागातून वाहतूक करावी लागत असल्याने येथील नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्याला विचारले असता, घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे वाहतूक बदल असल्याचे सांगितले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना देण्यापूर्वीच हे बदल केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. घोडबंदरची कोंडी ही मेट्रो तसेच इतर कामांमुळे होत आहे. परंतु त्याचा भूर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. – प्रवीण चव्हाण, रहिवासी.