भगवान मंडलिक
कल्याण पूर्वेत मलंगगड रस्त्यावर नांदिवली तर्फ गावात उपप्रादेशिक परिवहन विभाग ठाणे, कल्याण विभागाकडून अवजड माल, प्रवासी वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा चाचणी तळ आहे. या तळावर ठाणे, कल्याण आरटीओ क्षेत्रातील सुमारे दोनशे ते अडीचशे अवजड वाहने दररोज योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी सकाळी वेळेत क्रमांक लागावा म्हणून आदल्या दिवशी रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत येतात.
ही वाहने चाचणी तळाच्या बाहेरील रस्ता, मोकळ्या जागेत उभी करण्यात येत असल्याने काही स्थानिक मंडळी तळा बाहेरील जमिनी आमच्या खासगी मालकीच्या आहेत, असे प्रत्येक वाहनचालकाला सांगून त्यांच्याकडून दमदाटीने शंभर रुपये वसुली करतात, अशा तक्रारी आहेत.
जे वाहन चालक पैसे देत नाहीत. त्यांना धक्काबुक्की, त्यांच्या वाहनांच्या काचा फोडणे, त्यांच्याशी हुल्लडबाजी करून त्यांना पळवून लावणे असे प्रकार स्थानिक गावगुंड करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संध्याकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत स्थानिक मंडळी नांदिवली तलावाच्या कोपऱ्यावरील मंदिराच्या आडबाजूला वसुली मंच लावून बसलेले असतात. वाहनतळाच्या त्यांनी बनावट पावत्या तयार केल्या आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत जे वाहन चालक चाचणी तळावर हजर असतात, त्यांना तळावर योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी आरटीओ अधिकारी प्रवेश देतात. सकाळी सात वाजल्यानंतर वाहनांना चाचणी तळावर प्रवेश दिला जात नाही. आपला क्रमांक लवकर लागावा म्हणून मालवाहू ट्रक, कंटेनर, रिक्षा, टेम्पो चालक रात्रीच्या वेळेत नांदिवली तळा बाहेरील मोकळी जागा रस्त्यावर येऊन थांबतात, अशी माहिती या लूटमारीचा अनुभव घेतलेल्या एका वाहनचालकाने दिली.
वाहने चाचणी तळाच्या बाहेर थांबली की रात्री आठ वाजल्यानंतर स्थानिक मंडळी वाहन चालकाना ‘तुम्ही आमच्या खासगी जमिनीवर वाहने उभी केली आहेत. या जागेचे भाडे दर म्हणुन तुम्ही शंभर रुपये द्या’, अशी मागणी करतात. रात्रीची वेळ असल्याने वाहन चालक मुकाट्याने शंभर रुपये काढून देतात. जे वाहन चालक नकार देतात, त्यांना धक्काबुक्की केली जाते. इतकी दहशत स्थानिक वसुली मंडळींचे आहे. रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत स्थानिक मंडळी २०० ते २५० वाहन चालकांकडून एकूण पंचवीस हजार रुपये वसूल करत आहेत, असे माहितगारांनी सांगितले.
या प्रकाराबद्दल वाहन चालक, मालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. चाचणी तळा बाहेरील जागेसंबंधी बोलण्याचा अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना नसल्याने अधिकाऱ्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना भेटून या बेकायदा व्यवहारासंबंधी कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिस या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समजते. चाचणी तळाच्या आत गैरप्रकार झाले असते तर ती जबाबदारी आरटीओची आहे. वसुलीचा प्रकार बाहेर होत असल्याने त्याच्याशी आमचा काही संबंध येत नाही, असे एका आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले.
‘नांदिवली चाचणी तळाच्या बाहेर काही मंडळींकडून चालकांना देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्तांना कळविण्यात आले आहे. हा प्रकार कमी होण्यासाठी आरटीओ अधिकारी प्रयत्न करत आहेत. अशी माहिती कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली.