कसारा, कर्जत हून कल्याणकडे सकाळी येणाऱ्या लोकलना सोमवारी रेल्वे मार्गावरील दाट धुक्याच्या चादरीचा फटका बसला. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पाच ते १० मिनिटे उशिराने धावत होती.रेल्वे मार्गावर दाट धुक्याची चादर पसरल्याने मोटरमनला लोकल समोरील प्रखर झोताच्या दिव्याच्या उजेडात हळूहळू लोकल पुढे न्यावी लागत होती. धुक्यामुळे रेल्वे मार्गा लगतची दर्शक यंत्रणा मोटारमनला दिसत नव्हती. कर्जत ते बदलापूर, कसारा ते टिटवाळा रेल्वे स्थानकां दरम्यान सर्वाधिक धुके होते, असे प्रवाशांनी सांगितले. सोमवार कामावर जाण्याचा पहिलाच दिवस आणि त्यात लोकल उशिरा धावत असल्याने प्रवाशांचा संताप होत होता.
हेही वाचा >>>ठाकुर्लीत सामूहिक बलात्कार; दोन आरोपींना अटक
कसारा मार्गावरील आटगाव, खर्डी, आसनगाव, खडवली, टिटवाळा, कर्जत मार्गावरील नेरळ, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ भागात डोंगर, शेती, नद्या असल्याने या भागात सर्वाधिक धुके होते. हा परिसर मोकळा असल्याने सर्वदूर धुक्याची चादर पसरली होती. लोकल उशिरा धावत असल्याने त्याच्या मागे असलेल्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस उशिराने धावत होत्या. कर्जत, कसाराकडून येणाऱ्या जलद लोकल उशिराने धावत असल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांवर सकाळीच गर्दीचे दृश्य होते.
हेही वाचा >>>डोंबिवली- ठाकुर्ली सामुहिक बलात्कारातील दोन आरोपी अटक
रस्त्यावरुन धावणारी वाहनेही वाहना समोरील दिव्याचा प्रखर झोत करुन अपघात टाळण्यासाठी भोंगा वाजवित चालविली जात होती. सकाळी साडे सात वाजेपर्यंत हे वातावरण होते.कर्जत, शहापूर, टिटवाळा भागातील अनेक भाजीपाला उत्पादक जवळील रेल्वे स्थानकातून लोकलने भाजीपाला कल्याण येथील भाजीपाला बाजारात विकण्यासाठी आणतात. त्यांनाही बाजारात पोहचण्यास विलंब झाला.