लग्न समारंभ, यात्रा, सणउत्सव रद्द झाल्याने फटका
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई : संपूर्ण देशात करोनाचे संकट अधिक गडद होऊ लागल्याने देशातील टाळेबंदीचा कालावधीही वाढवण्यात आला आहे याचा परिणाम हा सर्वच क्षेत्रावर झाला असून ऐन उन्हाळ्यात येणारे लग्न समारंभ, सण उत्सवही रद्द झाल्याने याचा फटका वाजंत्री कलाकारांना बसला आहे.
सध्या करोनाच्या संकटामुळे शहरातील विवाह समारंभ, विविध यात्राउत्सव, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विवाह समारंभ आणि सण-उत्सव काळात वाजंत्री कलावंताना मोठी मागणी असते. मात्र कार्यक्रम व समारंभ रद्द करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या ऑर्डरही रद्द झाल्या आहेत.
या सणउत्सव काळात तीन ते चार महिन्यांत चांगली कमाई होत असते. बहुतेक कलावंतांचा त्यावरच उदरनिर्वाह चालतो. आपले कला-कौशल्य सादर करण्यासाठी हे कलावंताना सातत्याने सराव करीत असतो. सर्व काही बंद असल्याने घरी बसून राहावे लागत असल्याचे या कलाकारांनी सांगितले.
वसईतही जवळपास छोटी मोठी ४० ते ५० बँजो पथके आहेत. त्यामध्येही मोठय़ा संख्येने कलावंत विविध प्रकारचे वाद्यवादनाचे काम करतात. लग्नसराई म्हणजे आम्हा कलावंतासाठी सुगीचे दिवस असतात. अशा वेळी आम्ही कलावंत एकमेकांना सहकार्य करून वाजविण्याच्या ऑर्डर घेतो. यावर्षी त्या ऑर्डरच रद्द झाल्याने कलावंताचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे अविनाश कोळी यांनी सांगितले.
तसेच दरवर्षी गरजेनुसार सनई, ढोल, ताशे आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य्ो यांची खरेदी करतो. त्याचे पैसे मिळणाऱ्या ऑर्डरमधून वसूल होतात. परंतु यावर्षी सर्वच ठप्प झाल्याने तेही वसूल न झाल्याचे कलावंतांनी सांगितले.
वाजंत्री कलावंतांसमोर पेच
वाजंत्री कलावंतांनी जी नियोजित लग्न समारंभ आहेत, त्यांच्याकडून ठरलेल्या तारखांनुसार आगाऊ रक्कम घेतली. परंतु करोनाच्या या प्रादुर्भावामुळे अनेकांनी आपल्या लग्नाच्या तारखा या लांबणीवर नेल्या आहेत. त्यामुळे जर एकाच वेळी घेतलेल्या तारखा एकत्र आल्या तर अशा ठिकाणी वाजंत्री पथक कसे पाठवणार, असा प्रश्न या कलावंतासमोर उभा राहिल्याने पेच निर्माण झाला आहे.
आम्ही विविध ठिकाणच्या ऑर्डर आधीच घेतल्या होत्या. परंतु करोनामुळे या सर्व रद्द झाल्याने आमच्या पथकात काम करणारे कलावंत अडचणीत सापडले असून प्रत्येकाची आर्थिक घडीही कोलमडली आहे.
– गणेश भाईंदरकर, स्वर संगीत बँड पथक