ठाणे : लोकसभेच्या १९९६मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत भाजपकडून हिसकावून घेतला. तब्बल दोन दशकांनंतर भाजपने ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेसमोर आव्हान उभे केले. युती झाल्याने शिवसेनेने सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी खासदार राजन विचारे यांची खासदार म्हणून यथातथाच कामगिरी आणि ‘उच्चशिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित’ अशा प्रचाराने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
ठाणे मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून, भाजपनेही हातपाय पसरले आहेत. मीरा-भाईंदरमधील मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाचे प्राबल्य असल्याने या भागात भाजपचे वर्चस्व आहे. सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली होती. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करीत भाजपचा आमदार निवडून आला होता. यामुळे शिवसेनेला आता तसे सोपे राहिलेले नाही. फक्त युती झाल्याने शिवसेनेसाठी वातावरण अनुकूल आहे.
शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे अशी लढत होणार आहे. विचारे यांनी महापौर, आमदार, खासदार अशी विविध पदे भूषविली, पण त्यांची कामगिरी फार काही चांगली झालेली नाही. रमजानच्या काळात उपवास करणाऱ्या एका मुस्लीम कर्मचाऱ्याला नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बळेबळे चपाती भरविल्याबद्दल विचारे टीकेचे धनी झाले होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, प्रकाश परांजपे या उत्कृष्ट संसदपटूंची ठाण्याला थोर परंपरा होती. पण आधी संजीव नाईक आणि नंतर विचारे यांच्या काळात ही परंपरा खंडित झाली. राष्ट्रवादीत गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांनी निवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत नाईक पितापुत्राने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून पळच काढला. शिवसेनेत असताना ठाणे आणि कल्याणची खासदारकी भूषविलेल्या आनंद परांजपे यांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे. एक सुशिक्षित आणि आश्वासक चेहरा राष्ट्रवादीने दिला आहे.
सुशिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित
मागील पाच वर्षांतील बदललेली राजकीय गणिते पाहाता सद्यस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेला आव्हान देणे सोपे नाही, याची पुरेपूर कल्पना आघाडीच्या नेत्यांना आहे. ते सोपे असते तर नाईक कुटुंबीयांनी उमेदवारी परांजपे यांच्याकडे जाऊ दिली नसती. असे असले तरी खासदार म्हणून विचारे यांची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी पाहता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी टोकाची नाराजी आहे. ठाण्यात काम करताना विचारे नगरसेवकाच्या भूमिकेतून अजून बाहेरच आलेले नाहीत, असा आक्षेप भाजपचे नेते अगदी उघडपणे घेताना दिसतात. शिवसेनेतही त्यांच्या कामगिरीविषयी फारसे सकारात्मक चित्र नाही. नवी मुंबई, मीरा भाईदर या शहरांमध्ये तर खासदारांची कामगिरी अगदी यथातथाच राहिली आहे.
संघटनात्मक कार्यक्रमांना न चुकता हजर रहाणे हीच त्यांची जमेची बाजू असली तरी युतीची घोषणा होताच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खचलेले मनोबल ही बाबही त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. या निवडणुकीत आनंद परांजपे यांना रिंगणात उतरवून राष्ट्रवादीने खरे तर सुशिक्षित चेहऱ्याला संधी दिली आहे. कल्याण, ठाणे तसेच उपनगरीय रेल्वे प्रश्नावर असलेला गाढा अभ्यास ही परांजपे यांची जमेची बाजू. यापूर्वी लोकसभेत त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे, मांडलेले प्रश्न यामुळे राष्ट्रवादीने खासदार कसा असावा..सुशिक्षित की अल्पशिक्षित असे आवाहन आतापासूनच मतदारांना सुरू केले आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही फेसबुक तसेच सोशल मिडीयाद्वारे राष्ट्रवादीच्या या आवाहनाला साथ देत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला डिवचणे सुरू केले आहे. ही निवडणूक स्थानिक मुद्यांभोवती फिरावी असाही एक प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केला आहे. मात्र, युतीमुळे विजय आपलाच होणार या आत्मविश्वासात असलेले शिवसेनेचे नेते या प्रचारांना उत्तर देण्याऐवजी सभांमधून लाखांच्या मताधिक्याची भाषा करताना दिसत आहेत. भाजपचे स्थानिक नेते आमच्यासोबत नसले तरी त्यांचा मतदार आमच्या पाठीशी आहे, असेही काही शिवसेनानेते खासगीत बोलताना दिसत आहेत.
केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे केली आहेत. ठाणे पूर्व सॅटिस, कोस्टल रोड, ऐरोली-कटाई जोड रस्ता, बोरिवली-टिकूजिनीवाडी भुयारी रस्ता आणि नवीन स्थानक अशा प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला. अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. केलेल्या कामांच्या जोरावर नागरिक पुन्हा मला साथ देतील, असा माझा ठाम विश्वास आहे.
– राजन विचारे, शिवसेना खासदार
मतदारसंघातील अनेक मूलभूत, पायाभूत सुविधांचे प्रश्न अद्याप सुटू शकलेले नाहीत. त्यात कोपरी रेल्वे उड्डाणपूल, नवीन ठाणे स्थानक, ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्प, सीवूड ते उरण रेल्वे मार्ग, मीरा-भाईंदरमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि जलवाहतूक अशा प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदार खासदारांना विटले असून यंदा आम्हालाच साथ देतील, असा ठाम विश्वास आहे
-आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे उमेदवार