भाईंदर : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी मीरा-भाईंदर शहरात विविध मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळी मतदारांची गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले असले तरी प्रत्यक्षात यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान एक टक्क्याने कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुपारच्या वेळी मतदार मतदानासाठी उतरलेच नसल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी साडेसातपासूनच गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे यंदा विक्रमी मतदान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात सायंकाळी सहा वाजता मतदान संपले तेव्हा मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात एकंदर ४९.०८ टक्के इतकेच मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५०.१४ टक्के इतके मतदान झाले होते. मतदार याद्यातील घोळासोबतच मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगांमुळे परत गेलेले मतदार, एकाच मतदान केंद्रावर अधिक असलेले मतदान बूथ आणि केंद्रावर असलेली गैरसोय, संथ गतीने सुरू असलेले काम याचा मतदानावर परिणाम झाला.

बहुतांश मतदान केंद्रांवर सातऐवजी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. उन्हाच्या झळा बसू नये यासाठी मतदार सकाळी लवकरच घराबाहेर पडल्याचे दिसून येत होते. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मोठय़ा रांगा लागल्या होत्या. यंदा पहिल्यांदाच मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होत असल्याने मतदानासाठी वेळ लागत होता. त्यातच मतदान कर्मचाऱ्यांकडून देखील अतिशय संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोप केला जात होता. याचा परिणाम म्हणून मतदारांना दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत होते. इतका वेळ उन्हात उभे राहावे लागत असल्याने अनेक मतदान केंद्रांवरून मतदार मतदान न करताच परतत होते. काही मतदान केंद्रांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बूथ लावण्यात आले होते. त्यामुळे एकाच मतदान केंद्रावर भल्या मोठय़ा रांगा लागल्या. ही गर्दी पाहूनही अनेक जण माघारी फिरले. त्यातच दुपारी उन्हाची तीव्रता अधिक झाल्याने परत गेलेले मतदार पुन्हा मतदानासाठी आलेच नाहीत. वाढत्या उन्हामुळे सकाळी ओसंडून वाहणारी मतदान केंद्रे दुपारी ३ नंतर ओस पडल्याचे चित्रही ठिकठिकाणी दिसून आले. याचा एकत्रित परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारी गेल्या वेळेपेक्षाही घसरली आहे.   यंदा मीरा-भाईंदर मतदारसंघात ४ लाख २८ हजार ३२८ मतदार होते. पैकी २ लाख १० हजार २३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  मतदान केलेल्यांमध्ये पुरुष मतदारांची संख्या ५०.३४ टक्के आणि महिला मतदारांची संख्या ४७.६४ इतकी होती.मतदानाची टक्केवारी घसरण्यास निवडणूक कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांना द्यायच्या चिठ्ठय़ांचे वाटपच न केल्याने मतदारांना मतदान केंद्रांची माहितीच मिळाली नाही, मतदार याद्यांमधील गोंधळाबाबत तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2019 voting percentage reduced in mira bhayander