जयेश सामंत / मयूर ठाकूर , लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागविल्याने येथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना उधाण आले आहे. आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>> मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती

सरनाईक यांनी पाठविलेले हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचे असून दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढविल्याची चर्चा होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही उमेदवारी देऊ नका, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी घेतली होती. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती मागविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हे पत्र जुने असले तरी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळेच सरनाईक यांनी हे पत्र पुढे रवाना केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून ठाण्याच्या जागेसाठी माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक अशी तीन नावे चर्चेत आहेत.

ठाणे लोकसभेच्या जागेसंदर्भात महायुतीचे नेते जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांना मान्य असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश मिळाल्यास निवडणूक रिंगणात उतरताना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना घाई होऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीसच आपण ही माहिती मागविली होती. – प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2024 mla pratap sarnaik likely to be mahayuti candidate from thane zws