लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: स्वराज्य आणि सुराज्य यातील फरक सांगणारे, स्वराज्याची सर सुराज्याला येणार नाही हे जगाला सांगणारा आधुनिक इतिहासातील भारताचे नेते म्हणजे लोकमान्य टिळक होते असे मत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमाले अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी असून प्रत्येक संकटाचे संधी मध्ये रूपांतर करणारे होते. भगवद् गीतेतील लोकसंग्रह या शब्दाचा अवलंब करत टिळकांनी कार्य केले. अशी माहिती डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थितांना दिली.’स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान या विषयावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
हेही वाचा… ठाणे मनोरुग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात!
थोर व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत. तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे विचारमंथन व्याख्यानमालेचे मुख्य उद्देश असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.