‘लोकसत्ता आरोग्यभान’च्या प्रकाशनप्रसंगी तज्ज्ञांचा सूर; आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणारा वार्षिकांक सर्वत्र उपलब्ध
बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आयुष्य गुंतागुंतीचे होत असून त्याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. अशा परिस्थितीत योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती या माध्यमातून आरोग्याचे भान जपणे आवश्यक असल्याचा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी गुरुवारी दिला. निमित्त होते ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या वार्षिकांकाच्या प्रकाशनाचे.
‘थायरोकेअर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या वार्षिकांकाचे गुरुवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा सभागृहात प्रकाशन करण्यात आले. शीव रुग्णालयाच्या प्राध्यापिका डॉ. संगीता पेडणेकर, प्रसिद्ध व्यायाम प्रशिक्षक शैलेश परुळेकर, बालरोगतज्ज्ञ आणि भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ डॉ. संदीप केळकर, ‘परांजपे अथश्री’चे रवींद्र देवधर, ‘पितांबरी हेल्थकेअर डिव्हिजन’चे डॉ. संदीप माळी, टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा आणि ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब याप्रसंगी उपस्थित होते.
‘आरोग्यभान’ वार्षिकांक आता सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. लहानसहान गोष्टींमुळे येणाऱ्या नैराश्यावर मात कशी करता येईल, याच्या क्लृप्त्या या विशेषांकात देण्यात आल्या आहेत. याखेरीज भीती, ताणतणाव याबाबचे मार्गदर्शन, झोपेचे महत्त्व, भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे, मुले तसेच वयोवृद्धांमधील मानसिक आजार अशा विषयांचा या अंकात ऊहापोह करण्यात आला आहे.
या वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त ठाण्यात गुरुवारी ‘मानसिक संतुलनातून शारीरिक आरोग्याकडे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते. आहार, विहार, आचार आणि उपचार या चतु:सूत्रीवर प्रत्येकाने जीवन जगले पाहिजे. आपण काय खातो हे तितकेच महत्त्वाचे आहे. खाल्लेले पचन होण्यासाठी विहार म्हणजे व्यायाम करणे गरजेचे आहे. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन चांगला विचार मनात आणतो आणि निरोगी राहण्याकडे आपला कल वाढतो. – डॉ. संगीता पेडणेकर, शीव रुग्णालय.
आठ तासांची शांत झोप, वीस मिनिटांचा व्यायाम हा रोज गरजेचाच आहे. आजकाल अनेकजण विविध प्रकारचा व्यायाम करतात. पण सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे हा आहे. दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या अवयवांच्या हालचालींना व्यायामाच्या दृष्टीने पाहिले तर आरोग्य सुदृढ राहू शकते. – शैलेश परुळेकर, व्यायाम प्रशिक्षक.
आजकाल व्यक्ती मानसीकदृष्टय़ा आजारी होण्यामागचे मुख्य कारण समाजमाध्यम हे आहे. मानवी आरोग्य हे भावनांवर आधारित आहे. मित्र मैत्रिणी, कुटुंब यांच्याशी रोज संवाद झाला तर ताण हलका होतो. ताणमुक्त असल्यावरच आपण चांगला आहार आणि चांगला व्यायाम करू शकतो. – डॉ. संदीप केळकर, भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ
प्रायोजक
थायरोकेअर प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यभान’चे परांजपे अथश्री आणि पितांबरी हेल्थकेअर डिव्हिजन हे सहप्रायोजक आहेत आणि ब्रह्मविद्या साधक संघ हिलिंग पार्टनर आहेत.