‘लोकसत्ता’तर्फे ‘आपण आणि विकास’ परिसंवाद
मुंबईला उत्तरेकडे फोफावत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या मीरा भाईंदर, वसई-विरार आणि पालघर शहरांतील घडामोडींवर प्रकाशझोत पाडणाऱ्या ‘लोकसत्ता वसई-विरार’ या सहदैनिकाच्या आरंभाच्या निमित्ताने या पट्टय़ातील विकासावर साधक-बाधक चर्चा घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’कडून ‘आपण आणि विकास’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या या परिसंवादात साहित्यिक व पर्यावरणप्रेमी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, महिला सक्षमीकरण चळवळीच्या अग्रणी जयश्री सामंत, जागरूक नागरिक संस्थेचे सचिव चिन्मय गव्हाणकर आणि वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे सहभागी होत असून या परिसंवादास ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हेही उपस्थित राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी सेवेतील शेवटची स्थानके असलेल्या वसई-विरार परिसरात आणि त्याही पुढे अतिशय वेगाने नागरीकरण होत आहे. एकेकाळी निळाशार समुद्र आणि त्याला लाभलेली हिरवाईची किनार अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या या पट्टय़ात बहुमजली इमारती आणि वसाहती उभ्या राहात आहे.
परवडणाऱ्या घरांच्या आशेने मुंबईतील मोठा वर्ग येथे वास्तव्यास दाखल होत आहे. हे सारे होत असताना पायाभूत सोयीसुविधांच्या पातळीवर कितपत प्रगती होतेय, वसई-विरारचा विकास होतो आहे म्हणजे नेमके काय होत आहे, सध्या सुरू असलेल्या बांधकामालाच विकास म्हणायचे काय, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा काय आहेत, रस्ते-वीज-पाणी-शाळा-रुग्णालये पुरेशी व योग्य आहेत का, उद्योगांची स्थिती कशी आहे, विकास साधताना पर्यावरणाची साथ कशी घ्यावी, सांस्कृतिक ठसा कसा जपायचा, पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील का, महिला सक्षमीकरणासाठी काय करायचे, असे अनेक प्रश्न उभे रहात आहेत.
याच प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘आपण आणि विकास’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादामध्ये फ्रान्सिस दिब्रिटो, जयश्री सामंत, जागरूक नागरिक संस्थेचे सचिव चिन्मय गव्हाणकर आदी सहभागी होणार आहेत. तर या चर्चेवर पालिका प्रशासनाची भूमिका मांडण्याची जबाबदारी पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सतीश लोखंडे हे करणार आहेत. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.

Story img Loader