‘लोकसत्ता अर्थभान’मध्ये तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचा कानमंत्र
जागतिक, स्थानिक निमित्ताने भांडवली बाजारातील चढ-उतार असो अथवा अर्थव्यवस्थेतील अन्य घटकांमुळे होणारा म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम असो किंवा बदलत्या व्याजदरामुळे स्थिर उत्पन्न देणाऱ्या पर्यायांबाबतची चिंता, मात्र गुंतवणुकीतील सातत्य कायम ठेवल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीने आकर्षक परतावा नक्कीच कुणाला चुकत नाही, असे मार्गदर्शन रविवारी येथे गुंतवणूकदारांना करण्यात आले.
‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’तर्फे आयोजित ‘लोकसत्ता अर्थभान’ या गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रमात तज्ज्ञांनी रविवारी विरारकरांसाठी संवाद साधला आणि सनदी लेखापाल तृप्ती राणे, अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी व आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या मुंबई परिमंडळाच्या विक्री व सल्लागार विभागाचे प्रमुख अमित मांजरेकर यांनी यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांच्या बचतीविषयक शंकांचे निरसनही केले.
‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडा’चे रुचिर शहा व ‘लोकसत्ता’चे सुहास बिऱ्हाडे यांनी यावेळी पाहुण्यांचे स्वागत केले. तर वीरेंद्र तळेगावकर यांनी या अर्थसाक्षरतेवरील उपक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पारंपरिक गुंतवणूक पर्यायांची ओळख व आढावा घेताना वयाच्या व उत्पन्नाच्या विविध टप्प्यांतील गुंतवणुकीबाबत तृप्ती राणे यांनी प्रकाश टाकला. उत्पन्न, खर्च व बचत यांची सांगड घालताना आवश्यक गरजा व महागाई याकडे दुर्लक्षून चालणार नाही, असे त्यांनी सुचविले. तर कंपन्यांचे समभाग व म्युच्युअल फंड यांचा संबंध विशद करताना कौस्तुभ जोशी यांनी विविध उदाहरणांद्वारे या नवागत व जोखीम मात्र अधिक परतावा देणाऱ्या पर्यायाबाबत गुंतवणूकदारांनी कोणती धोरणे अनुसरावी हेही सांगितले. भांडवली बाजाराचा संक्षिप्त आढावा, त्यातील कंपन्यांच्या समभागांची हालचाल तसेच म्युच्युअल फंडांबाबत त्यांचे प्रकार, कोणत्या ध्येयासाठी कोणता फंड अथवा कोणते फंड क्षेत्र याबाबत त्यांनी सांगितले. तर अमित मांजरेकर यांनी म्युच्युअल फंडांचे कार्य, त्यांची वैशिष्टय़े व अन्य पर्यायांप्रमाणेच फंडांच्या बाबतीतही गुंतवणुकीतील सातत्य यावर आपल्या मार्गदर्शनातून भर दिला.