डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागातील नेहरू रस्त्यावरील शिधावाटप दुकान आणि स्वच्छतागृहाच्या मोकळ्या जागेत मागील काही महिन्यांपासून उघड्या जागेत जुगाराचा अड्डा सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. पंजाबी जुगार अड्डा म्हणून हा अड्डा प्रसिध्द होता. परिसरातील रहिवासी या जुगार अड्ड्यामुळे त्रस्त होते. ‘लोकसत्ता’ ऑनलाईनने याविषयीचे वृत्त दोन दिवसापूर्वी प्रसिध्द करताच, रामनगर पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी सकाळी या अड्ड्यावर छापा मारून दोन जणांना अटक केली.

या दोन जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार नीलेश पाटील यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून नेहरू रस्त्यावर शिधावाटप दुकानाच्या बाजुला मोकळ्या जागेत बिनधास्तपणे उघड्यावर जुगार अड्डा चालविला जात होता. याठिकाणी झटपट पैसे मिळत असल्याने डोंबिवली शहर परिसरातील जुगारी याठिकाणच्या अड्ड्यावर खेळण्यासाठी येत होते. यामध्ये काही मद्यपी, गर्दुल्ले यांचाही सहभाग होता. अनेक वेळा त्यांच्या पैशावरून वादावादी होत होती. त्यांचा या भागात सतत ओरडा असायचा.

अनिता बबलू सिंग (४०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली पूर्वेतील शेलार चौकातील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीमध्ये राहतात. याच अड्ड्यावर पोलिसांनी राहुल भीमराव बनसोडे (३०) यांना अटक केली आहे. ते शेलार चौकातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतात. ‘लोकसत्ता’ ऑनलाईमध्ये नेहरू रस्त्यावरील जुगार अड्डयाचे वृत्त प्रसिध्द होताच रामनगर पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर पाळत ठेवली होती.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे जुगारी या अड्ड्यावर खेळण्यासाठी जमा झाले होते. त्यावेळी या अड्ड्याच्या परिसरात सापळा लावून बसलेल्या रामनगर पोलिसांनी अड्ड्यावर छापा मारून तेथील दोन जणांना जुगाराच्या सामानासह अटक केली. या अड्ड्यावर सरोट नावाचा सट्टा खेळला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सरोट झटपट पैसे मिळण्याचे जुगारातील साधन मानले जाते.

पोलिसांनी अड्ड्यावर छापा मारताच जुगारींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. साखळी करून असलेल्या पोलिसांनी त्यांना जागीच रोखले. या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी आठशे रुपयांच्या चलनी नोटा, फ्लेक्स चार्ट, विविध वस्तू, प्राणी, पक्षी, वनस्पती, वस्तू, यांची चित्रे, बंद चिठ्ठ्या, ओरिजन पप्पू प्लेइंग पिक्चर्स लिहिलेले साहित्य आढळून आले. अनिता सिंग या हा जुगार अड्डा चालवित असल्याचे आणि तेथे राहुल बनसोडे हे या जुगार अड्ड्यावर खेळत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भालेराव, साहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे, अंमलदार नीलेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या अड्ड्यावर कारवाई झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Story img Loader