‘लोकसत्ता’तर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी गुरुवार २२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून गडकरी रंगायतनसमोरील शिवसमर्थ विद्यालयात रंगणार आहे. त्यात ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील ३२ महाविद्यालयांतील ६० विद्यार्थी भाग घेत आहेत. राज्यभरातील अडीचशेहून अधिक महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरी येथे झालेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता ठाण्यातील युवा वक्त्यांचा कस लागणार आहे. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस, भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने तसेच जनकल्याण सहकारी बँकेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर ही स्पर्धा होत आहे.
प्राथमिक फेरीसाठी देण्यात आलेल्या विषयांपैकी एका विषयावर स्पर्धकास किमान आठ ते दहा मिनिटे भाषण करायचे आहे. विषयाचे सादरीकरण, भाषेचे सौंदर्य, समृद्धी आणि आशय या निकषांवर परीक्षण होणार आहे. या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांना विभागीय आणि अंतिम फेरीत आपले वक्तृत्व गुण सिद्ध करावे लागतील. विभागीय अंतिम फेरीदरम्यान स्पर्धकांना एका महनीय वक्त्याचे मार्गदर्शनही मिळणार आहे.
नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
आपल्याला नायक का लागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधत आणि सामाजिक चळवळींच्या राजकीय परिणामांचा अन्वयार्थ लावत लोकसत्ता वक्तृत्व स्पध्रेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीला बुधवारी प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या स्पध्रेत पहिल्या दिवशी नागपूर शहरातील ८० विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व कला सादर केली. स्पध्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे २१ व २२ हे दोन दिवस नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरी घेतली जाणार आहे. बुधवारी पहिल्या दिवशी नागपूर शहरातील स्पर्धकांनी विविध विषयांवर आपली मते जोरकसपणे मांडली. आपल्याला नायक का लागतात?, सामाजिक चळवळीचा राजकीय परिणाम, अतिसंपर्काने काय साध्य?, जगण्याचे मनोरंजनीकरण व जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत? या विषयांवर स्पर्धकांनी आपली मते मांडली.

Story img Loader