स्वच्छ आणि सुंदर असा समुद्र किनारा, माड आणि पोफळीची डोलणारी झाडे आणि त्यातून डोकावणारी टुमदार कौलारु घरे अशी निसर्ग सौंदर्याची उधळण असलेला परिसर अशीच कोकणाची ओळख असली तरी कोकणची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे मासे. भात आणि मासे हे इथल्या रहिवाशांच्या मुख्य अन्नपदार्थ. विविध प्रकरेच चविष्ट मासे हे कोकणला लाभलेले आणखी एक निसर्गाचे वरदान. मासे बनविण्याची कोकणची स्वत:ची अशी विशिष्ट पद्धत आहे, चव आहे. केवळ मासेच नव्हेत तर कोकणातील शाकाहारी पदार्थही तितकेच लोकप्रिय आहेत.  मात्र ही कोकणातल्या या पदार्थाची चव चाखण्यासाठी खास कोकणात जायची गरज नाही, कारण खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी खास कोकणातील पदार्थ उपलब्ध आहेत मिरा रोडच्या कोकण वैभव मध्ये.

मीरा रोडच्या सुष्टी परिसरात आठ वर्षांपूर्वी प्रशांत पालांडे या कोकणी माणसाने कोकण वैभव या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली. खरे तर सृष्टी हा उच्चभ्रु आणि बहुसंख्येने अमराठी परिसर. अशा ठिकाणी मराठमोळ्या आणि त्याही खास कोकणी पद्धतीच्या पदार्थाचे हॉटेल सुरु करणे म्हणजे एक प्रकारचे धाडसच होते. परंतू इथल्या अमराठी माणसांना गेल्या आठ वर्षांत कोकणी पदार्थाची गोडी लावण्यात कोकण वैभव यशस्वी ठरले आहे.

कोणतेही हॉटेल यशस्वी ठरते ते म्हणजे त्यातील पदार्थाची टिकवलेली चव आणि त्यासाठी वापरले जाणारे मसाले यामुळे. पालांडे हे मुळचे खेड तालुक्यातले. आपल्या गावच्या खास कोकणी मसाल्यांची रेसीपी त्यांनी आपल्या पदार्थासाठी वापरली आहे. या मसाल्यामध्ये वापरण्यात येणारे मसाल्याचे पदार्थ, त्यांचे विशिष्ट प्रमाण यांची रेसीपी पालांडे यांनी मुंबईतल्या लालबागचे सुप्रसिद्ध मसालेवाले खामकर यांना दिली आणि गेली आठ वर्षे कोकण वैभवचे मसाले खामकरच तयार करत आहेत. त्यामुळे कोकण वैभवमधल्या पदार्थाची चव आजही तीच आहे हे याचे वैशिष्टय़. इथल्या खानसाम्यांनाही वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत असते. मुंबईतल्या नामांकित हॉटेलमधील शेफ यासाठी निमंत्रित करण्यात येत असतात. त्यामुळे पदार्थाची चव आणि त्याचे मसाले यात राखलेले सातत्य हे कोकण वैभवचे वैशिष्टय़ आहे.

इथे मिळणाऱ्या माशांच्या विविध डीशमध्ये प्रामुख्याने ओल्या नारळाचा वापर केला जातो. कोकण किनारपट्टीवर मिळणारे पापलेट, सुरमई, कोळंबी, बोंबील , तिसऱ्या म्हणजेच शिंपल्या, खेकडे आणि बांगडा या माशांना खवय्यांकडुन सर्वाधिक पसंती मिळत असते. त्यामुळेच याठिकाणी भरलेले पापलेट, तवा पापलेट, रस्सेदार पापलेट, सुरमईचे तिखले, तवा सुरमई, कोळंबीचे भुजणे, चिंबोरी अर्थात खेकडय़ाचे कालवण, झकास तिसऱ्या, कुरकुरीत मांदेली आणि बोंबील, बांगडा फ्राय आदी पदार्थाची मेन्यु कार्डमधली नावे वाचतानाच तोंडाला पाणी सुटु लागते. केवळ मासेच नव्हे तर चिकन आणि मटनाचे कोंबडी वडे, मटण भाकरी असे विविध प्रकार कोकण वैभवमध्ये मिळतात. चिकन आणि मटणासाठी मात्र ओल्या नारळा ऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो. शिवाय सोबतीला जीभ खवळणारी सुक्या जवल्याची कोशिंबीर, सुकी बोंबील चटणी देखील मिळते. कोकण वैभवमध्ये ठराविक कालवधीनंतर क्रॅब फेस्टीवल, फिश फेस्टीवल, तंदूरी फेस्टीवल, बिर्याणी फेस्टीवल आयोजित करण्यात येत असतात.

शाकाहारींची देखील काळजी कोकण वैभवमध्ये घेतली जाते. डाळिंबी उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, वांग्याचे भरीत, मसाले भात इतकेच नव्हे तर कोकणात खास प्रसिद्ध असलेले आंबोळी आणि घावन हे तांदळापासून तयार करण्यात येत असलेले विशिष्ट पदार्थही याठिकाणी उपलब्ध आहेत. जेवणाची रुची वाढविण्यासाठी सांडगी मिरची, कुरडई, फेण्यादेखील सोबत आहेतच.

एवढे चमचमीत पदार्थ खाऊन झाल्यानंतर ते पचवणेही तितकेच महत्त्वाचे. यासाठी खास कोकणची ओळख असलेली इथे मिळणारी आमसुलाची सोलकढी तर आवर्जुन घ्यायलाच हवी. कोकणी पदार्थाव्यतिरिक्त पंजाबी, चायनीज आणि तंदूर पदार्थ देखील याठिकाणी मिळत असले तरी अस्सल कोकणी पदार्थाची चव चाखण्यासाठी कोकण वैभवला भेट द्यायलाच हवी.

कोकण वैभव

कुठे?- पत्ता : सृष्टी कॉम्प्लेक्स, सेक्टर ५, सूर्या शापिंग सेंटर, मीरा रोड

(वेळ : सकाळी ११ ते ४ आणि सायंकाळी ७ ते ११.३०)