ठाणे विभागात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची बाजी

दर्जेदार कलाकृतीयुक्त ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ची ठाणे विभागीय अंतिम फेरी गडकरी रंगायतन येथे शनिवारी जल्लोषात पार पडली. ठाणे विभागातून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘चौकट’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीत मजल मारली आहे.  जातीमुळे समाजात होणारे तणाव आणि आरक्षण या विषयावर आधारित ‘चौकट’ ही एकांकिका राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत ठाणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ठाणे विभागीय अंतिम फेरीत पाच महाविद्यालयांमध्ये चुरशीची लढत रंगली. बी. के. बिर्ला महाविद्यालय कल्याण यांच्या ‘कपल गोल्स’ एकांकिकेने दुसरा तर उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालाच्या ‘सेंट्री’ या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकाविला.

नेपथ्य, संहिता, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि वेशभूषा या सर्वाना एका माळेत गुंफत अभिनयाची शिकस्त करून आशययुक्त एकांकिकांचे सादरीकरण ठाणे विभागीय अंतिम फेरीत पाहायला मिळाले. तरुणांच्या सळसळत्या उत्साहात विषयांच्या कल्पकतेने विविध एकांकिका उपस्थितांची मने जिंकून घेत होत्या.

मंदिर बांधण्यापेक्षा समाजकार्याला हातभार लावणे महत्त्वाचे असल्याचा संदेश मॉडेल महाविद्यालयाच्या ‘टिळा’ एकांकिकेद्वारे देण्यात आला. निद्रानाश आणि एका तरुणाच्या आयुष्यात या आजारामुळे होणारे बदल या विषयावर भाष्य करणारी ‘जो बाळा जो जो रे जो’ ही एकांकिका उरणच्या कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाने सादर केली. आजी आणि नातू यांच्या नात्यातील संबंधावर भाष्य करणारी ‘कपल गोल्स’ एकांकिका कल्याणच्या बी.के.बिर्ला महाविद्यालयाने सादर केली. ठाणे प्राथमिक फेरीतून ठाणे विभागीय अंतिम फेरीतील पाच एकांकिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती.

प्रायोजक

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे टॅलेन्ट हंड पार्टनर आयरिश प्रोडक्शन असून एरेना मल्टीमीडिया हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. अस्तित्वच्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिके’च्या मंचावर सादर झालेल्या कपल गोल्स या एकांकिकेमध्ये आजीची भूमिका साकराली होती. प्रथमच एकांकिकेत पारितोषिक मिळाले आहे. ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या मंचावरून हे पारितोषिक स्वीकारताना मनापासून आनंद झाला आहे. यामुळे अभिनयामध्येच करिअर करण्याचे ठरवले आहे.    – गार्गी घेगडमल, (सवरेत्कृष्ट अभिनय) बी.के.बिर्ला महाविद्यालय- कपल गोल्स

‘लोकसत्ता लोकांकिके’च्या मंचावर भूमिका सादर करताना खूप भीती वाटत होती. मात्र या मंचावरून अभिनयाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. सवरेत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक स्वीकारताना खूप गहिवरून आले होते. यापुढेही ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या स्पर्धेसाठी परीक्षण केलेल्या परीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार उत्तम अभिनय साकारण्याचा प्रयत्न करेल.   – गौरव सरफरे, (सवरेत्कृष्ट अभिनय) कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय- जो जो रे बाळा जो जो

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पोहोचण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारितोषिक मिळवण्यासाठी अभिनयातील बारकावे, आवाज आणि विभागीय अंतिम फेरीतील परीक्षकांनी केलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ठाणे विभागाने अद्याप ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम फेरीत यश मिळवलेले नाही. मात्र ठाणे विभागाचे महाअंतिम फेरीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याने, उत्तम सादरीकरणाचा प्रयत्न करू.   – मनीष साठे (सवरेत्कृष्ट दिग्दर्शक), सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय – चौकट