‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत आरक्षण, शहरी नक्षलवादावर भाष्य

चाकोरीबद्ध विषयांऐवजी ताज्या घडामोडींवर भाष्य करणाऱ्या आणि समाजापुढील ज्वलंत विषयांना थेट भिडणाऱ्या एकांकिकांनी शनिवारी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत परीक्षक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.  सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत चौकट एकांकिका सादर करत राज्यस्तरावर महाअंतिम फेरीसाठी ठाणे विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. आरक्षण, अन्य पायाभूत सुविधांऐवजी मंदिरे बांधण्याचा आग्रह, मिरवणुकांमुळे होणारी वाहतूक कोंडी अशा सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या एकांकिका या वेळी सादर करण्यात आल्या.

लोकसत्ता लोकांकिकेची ठाणे विभागीय अंतिम फेरी शनिवार, ८ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली. सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांनी एकांकिका पाहण्यासाठी गर्दी केली होती. नाटक किंवा महाविद्यालयीन स्तरावरील एकांकिकांचे विषय, संकल्पना या साचेबद्ध होत असल्याचा सूर नेहमीच उमटतो. ही धारणा मोडून काढण्यात या एकांकिका काही प्रमाणात यशस्वी ठरल्या. ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या चौकट एकांकिकेने परीक्षकांची मने जिंकत लोकांकिकेच्या महाअंतिम फेरीत मजल मारली. मात्र चुरशीची लढत झालेल्या पाचही एकांकिका या नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीच्या होत्या. महाअंतिम फेरीत ठाणे विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘चौकट’ एकांकिका आरक्षण या विषयावर भाष्य करणारी होती. जातीनिहाय आरक्षणासाठी कशाप्रकारे आंदोलने होत आहेत, त्यातून तरुणांना कसे भडकवले जात आहे, त्याचा राजकीय फायदा कसा घेतला जात आहे याची उकल करणारी चौकट एकांकिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

ग्रामीण भागातून शहरात गेल्यानंतर उद्योजक होऊन परत गावी आलेला तरुण गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो, गावातील देव हा उघडय़ावर असून त्याच्या संरक्षणासाठी मंदिर बांधून देण्याचा आग्रह गावकरी त्याच्याकडे करतात. मंदिरे बांधण्यापेक्षा गावात शाळा, बंधारे बांधणे महत्त्वाचे आहे असा सामाजिक संदेश देणारी ‘टिळा’ नावाची एकांकिका डोंबिवलीच्या मॉडेल महाविद्यालयाने सादर केली. सध्या राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असताना विद्यार्थ्यांनी एकांकिकेच्या माध्यमातून मंदिरापेक्षा समाजासाठी गरजेच्या गोष्टींची आवश्यकता अधिक असल्याचे समजावून सांगितले.

एका तरुणाच्या आईच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात नेणे गरजेचे असते, मात्र घराबाहेर संपूर्ण रस्त्यावर गणेशोत्सवाची मिरवणूक असल्याने रुग्णवाहिका घराजवळ येऊ शकत नाही. वेळेत रुग्णालयात जाता न आल्याने आईचा मृत्यू होतो. याचा तरुणाच्या मनावर काय परिणाम होतो, हे दर्शवणारी ‘जो बाळा जो जो रे’ ही एकांकिका उरणच्या कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाने सादर केली.

देशात निष्क्रिय व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला शहरी नक्षली ठरवण्यात येते. त्यामुळे माणसातली माणुसकीही संपत चाललेली आहे. माध्यमांना जबाबदार धरत राज्यकर्ते सर्वसामान्य माणसाचा कशाप्रकारे आवाज बंद करत आहेत. वाढत्या बांधकामामुळे जंगलांचा होणारा ऱ्हास यावर भाष्य करणारी ‘सेंट्री’ ही एकांकिका उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाने सादर केली.

मानसिक रुग्णांना समजून घेणे, काळानुरूप वयोवृद्ध व्यक्तींना होणाऱ्या मानसिक आजारांत कुटुंबीयांनी धीर देणे किती आवश्यक आहे, हा संदेश कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या ‘कपल गोल्स’ एकांकिकेद्वारे देण्यात आला.

प्रायोजक

‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘पितांबरी’ सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पर्धेचे टेलिकास्ट पार्टनर ‘झी मराठी’ आणि न्यूज पार्टनर ‘एबीपी माझा’ आहेत.

विद्यार्थ्यांनी ताज्या घडामोडींवर भाष्य करणाऱ्या एकांकिका सादर केल्याचे पाहून बरे वाटले. तटस्थ राहून विषयांचे विविध पैलू हाताळण्यात आले.  मात्र कलाकारांनी फक्त टाळ्या किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी याचा विचार न करता रंगमंचावर मांडलेले विचार वैयक्तिक आयुष्यातही अवलंबणे गरजेचे आहे.      – संपदा जोगळेकर-कुलकर्णी, अभिनेत्री आणि दिग्दर्शक

एकांकिका बेधडक होत आहेत. मुले त्यांचे विचार बिनधास्त मांडत आहेत. त्यांची दृष्टी व्यापक होत आहे. ताज्या ज्वलंत विषयांवर भाष्य करणाऱ्या एकांकिका पाहून बरे वाटले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ हे चांगले माध्यम आहे. विद्यार्थ्यांना आता फक्त सुयोग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आरक्षणसारख्या विविध विषयांवर सादर होणाऱ्या एकांकिका पाहून आनंद झाला. एकांकिकांमधील बदल स्वागतार्ह आहे. – कुमार सोहोनी, दिग्दर्शक