ठाणे – प्राथमिक फेरीत परिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संवाद, अभिनय, संगीत, नेपथ्य यामध्ये बदल करत महाविद्यालयीन रंगकर्मी विद्यार्थी विभागीय अंतिम फेरीसाठी सज्ज झाले आहेत. येत्या शनिवारी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या ठाणे विभागीय अंतिम फेरी होणार असून या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी दहा -बारा तास सराव करीत आहेत. स्पर्धेसाठी एक दिवस उरल्याने विद्यार्थ्यांची तालीम अंतिम टप्प्यात आली आहे.
महाविद्यालयीन स्तरावर नावाजली जाणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरी असे टप्पे पार केल्यानंतर आठ एकांकिका महाअंतिम फेरीत पोहोचणार आहेत. ठाणे विभागातील प्राथमिक फेरीतून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय (ठाणे), एसएसटी महाविद्यालय (उल्हासनगर), जोशी बेडेकर महाविद्यालय (ठाणे), एनकेटी महाविद्यालय (ठाणे), सीके ठाकूर महाविद्यालय (पनवेल) ही पाच महाविद्यालये विभागीय अंतिम फेरीत दाखल झाली आहेत. ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी, १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजल्यापासून विभागीय अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा >>>कल्याणमधील कपोते वाहनतळावर पालिकेचा ताबा; भाडे थकविल्याने ठेकेदार काळ्या यादीत
विभागीय अंतिम फेरीतून महाअंतिम फेरीत जाण्यासाठी या पाचही महाविद्यालयांत जोरदार तयारी सुरू आहे. प्राथमिक फेरीत परीक्षकांनी दिलेल्या सूचनांनुसार संहिता, सादरीकरण, संवाद, अभिनय, संगीत अशा गोष्टींत आवश्यक ते बदल करतानाच प्रकाशयोजना आणि नेपथ्य यांवर भर दिला जात आहे. दररोज अभ्यास संभाळून हे रंगकर्मी विद्यार्थी दहा ते बारा तास एकांकिकेचा सराव करताना दिसत आहेत. गेले दोन वर्षे आमचे महाविद्यालय महाअंतिम फेरीत जात आहे. त्यामुळे यंदाचे वर्षे हॅट्रीकचे असून जास्त जबाबदारी आहे, असे ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या कुक्कुर या एकांकिकेचे दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितले. एकांकिकेचे सादरिकरण उत्तम कसे होईल याकडे आम्ही जास्त लक्ष देत आहोत. नेपथ्यची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सराव करतात. या सरावा दरम्यान महाविद्यालयाचे उत्तम सहकार्य मिळत आहे, असेही ते म्हणाले. विभागीय अंतिम फेरीसाठी दाखल झाल्याने सी के ठाकूर महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. सेमिनार हॉल मध्ये सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत आमची तालिम चालते. काही विद्यार्थ्यांची परिक्षा सुरू असून परिक्षेनंतर ते तालीमसाठी येतात.
हेही वाचा >>>डोंबिवलीत सारस्वत बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी गुन्हा
प्राथमिक फेरीत परिक्षकांनी सांगितलेले बदल तसेच वेळमर्यादा त्यावर काम सुरु आहे. यंदा आमच्या एकांकिकेत नेपथ्य जास्त नसून एकांकिकेत रेट्रो वेशभुषा आणि विद्यार्थी स्वत: गीत गायन करतात. त्याच्या तयारीसाठी आम्ही अधिक भर देत आहोत, अशी प्रतिक्रिया सीके ठाकूर महाविद्यालयाचे गणेश जगताप यांनी दिली. एसएसटी महाविद्यालयाचे सांस्कृतीक विभागाचे हर्षल सुर्यवंशी सांगतात की, आमच्या ऑपरेशन या एकांकिकेचे नेपथ्य तयार झाले आहे. सध्या आम्ही प्रकाशयोजना आणि संगीत यावर अधिक भर देत आहोत. विद्यार्थी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत सराव करत आहेत. तर, जोशी बेडेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचा प्रतिनिधी साई नाईक याने सांगितले की, आमच्या क्रॅक्स इन द मिरर या एकांकिकेतील काही विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु आहेत. परंतू, महाविद्यालयाने एकांकिकेच्या सरावासाठी त्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेची वेळ बदलून दिली आहे. प्राथमिक फेरीत परिक्षकांनी एकांकिकेत सांगितलेल्या बदलांवर दिग्दर्शकांनी काम केले आहे. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थी एकांकिकेचा सराव करत आहेत.