‘लोकसत्ता’च्या ‘नामरंगी रंगले’ कार्यक्रमाला तुडुंब गर्दी

वसई : आषाढी एकादशीनिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नामरंगी रंगले’ या कार्यक्रमात वसई-विरारकर भक्तिरसात बुडून गेले. विठ्ठल नामाच्या गजरात कायक्रमाला सुरुवात झाली, अखंड नाद-स्वरांच्या संगतीने रसिक भारावून गेले. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. सभागृह तुडुंब भरल्याने काहींनी सभागृहातील पायऱ्यांवर बसून कार्यक्रम पाहिला.

वसईत वाचकांसाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा एक भाग म्हणून आषाढी एकादशीनिमित्त ‘नामरंगी रंगले’ हा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता.

वसईच्या पारनाका येथील अनंतराव ठाकूर नाटय़गृहात भक्तिगीतांनी शनिवारची सायंकाळ आनंदून गेली. शास्त्रीय गायक संजीव चिम्मलगी आणि मुग्धा वैशंपायन हे दोघे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. वसईत शनिवारी दुपारनंतर पाऊस कोसळत होता. तरीही सभागृहावर दुपारपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शवली होती. दुपारनंतर काही तासांतच सभागृह रसिकांनी भरले. काहींना आसने मिळाली नाहीत. परंतु त्याची तमा न बाळगता त्यांनी पायऱ्यांवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक दिनेश गुणे यांनी ‘लोकसत्ता’ची भूमिका विशद केली. ज्ञान, विज्ञान, संस्कृती आणि कला प्रत्येकापर्यंत पोहोचवणं ही ‘लोकसत्ता’ची भूमिका आहे. कार्यक्रमांतून लोक आणि संस्था एकमेकांशी जोडले जातात. एकमेकांना जोडणं हे ‘लोकसत्ता’चं काम आहे, असे ते म्हणाले. राजकारण आणि मनोरंजन हे अलीकडच्या काळात समान शब्द झालेत, मात्र ‘लोकसत्ता’ने या दोघांत गल्लत केलेली नाही. खुंटलेला संवाद घडवून आणण्याचे आव्हान, लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम ‘लोकसत्ता’ माध्यम म्हणून करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ग्वाल्हेर घराण्याचे गायक संजीव चिम्मलगी आणि ‘लिटिल चॅम्प’ कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली मुग्धा वैशंपायन यांनी भक्तिगीते सादर केली. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘जोहार मायबाप’ हे अभंग सादर करून वसई-विरारकरांना भक्तिगंगेत बुडवून टाकले.

‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिगीताने सर्वानाच नादावले. विठ्ठल नामाच्या गजराने वसई दुमदुमली. कार्यक्रमाचे निरूपण कुणाल रेगे आणि अपर्णा काळे यांनी केले. नीलेश देवस्थळी, राजेश चक्रदेव, अनिल करंजावकर, मनोज गुरव, संतोष दिवेकर आणि विनोद पडघे यांनी गायकीला सांगीतिक साथ दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रसाद महाडकर यांचे होते.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला वसई-विरारमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर, वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, लेखक मुकुंद सराफ, अभिनेत्री हर्षदा बामणे, पर्यावरण संवर्धक समितीचे समीर वर्तक, चित्रकार सुभाष गोंधळे, प्रभाग समिती आयचे सभापती प्रवीण शेट्टी, वसई कला क्रीडा महोत्सवाचे प्रकाश वनमाळी, नगरसेविका पुष्पा जाधव, माजी नगरसेवक विजय वर्तक, बहुजन विकास आघाडीचे नेते संदेश जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या  पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. लोकसत्ताच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ‘आपली आवड’ या स्पर्धेतील जुलै महिन्यातील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.