खाडी पाणी शुद्धीकरण प्रकल्प

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने खाडीच्या पाण्याचे शुद्धकरणाचा घेतलेल्या निर्णयाबाबत देशाचे उद्याचे सृजाण युवा नागरिकांनी नोंदविलेल्या प्रतिक्रिया

निर्णय स्तुत्य

बोअर खणून, पाण्याच्या अपव्यय करून पाण्याचा तुटवडा आपण निर्माण केला आहे. त्यामुळे खाडीचे पाणी शुद्ध करण्याच्या ठाणे महानगरपालिकेचा निर्णयाचे स्वागत करायला हवे. खाडीतील शुद्ध पाण्यामुळे भविष्यात ठोस असे पाण्याचे नियोजन करणे शक्य होईल.

– शीतल कदम, ठाणे

रामबाण उपाय

जागोजागी उपलब्ध असलेले पाणी, त्याचे वाटप, पुरवठय़ाचे व वापराचे गणित, पाण्याची उत्पादकता असे या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. ठाणे जिल्हय़ातील खाडी पाणी शुद्धीकरणाचा निर्णय हा खरोखरच स्वागतार्ह आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवता येईल.

– सायली विचारे, ठाणे

प्रक्रिया चांगली

खाडीच्या शुद्धीकरणाचा निर्णय योग्य आहे. खाडीतील पाणी पिण्यायोग्य करण्याचे प्रयोग यापूर्वीही देशातील विविध ठिकाणी झाले आहेत. खाडीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाणार आहे ती तलावातील पाणी स्वच्छ होण्यासाठीही करावी असे वाटते.

– चित्रांक मथुरे, ठाणे

आधी प्रदूषण रोखा..

खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनविण्याचा संकल्प चांगला आहे. मात्र खाडीतील पाण्याचे प्रदूषण रोखणे अधिक गरजेचे आहे. शिवाय पाण्याबरोवरच तलावांचे शुद्धीकरण महत्त्वाचे आहे.

 – हर्षद समर्थ, ठाणे

खर्चीक योजना कशाला?

ठाणे शहराला येऊरसारखे जंगल लाभले आहे. यामध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ यांसारख्या योजनाही राबविण्याची गरज आहे. सध्या ठाणे महापालिकेच्या खाडी पाण्याच्या शुद्धीकरणासारख्या खर्चीक योजनांची गरज काय?

– चेतन घारे, ठाणे

Story img Loader